अहमदनगर - नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
नगर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पावणे तीनशेच्या जवळ पोहोचला आहे. कोरोनाबाधित सापडलेल्या भागात मनपाच्या आरोग्य विभागाकडून उपाय योजना राबवल्या जात आहेत. असे असतानाही महापालिकेच्या नगररचना विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नगररचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळामध्ये, कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील नागरिकांसह नगरसेवक, पदाधिकार्यांची नेहमीच महापालिकेत वर्दळ असते. कोरोनाचा शिरकाव महापालिकेत झाला असल्याने महापालिका कार्यालये काही दिवसांसाठी बंद करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच मनपा कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आले. तसेच नगररचना विभागाची इमारत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मनपा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून केवळ अत्यावश्यक कामे असणाऱ्या नागरिकांनाच तपासणी करून आणि त्यांच्या नोंदी करून सोडण्यात येत आहे.