अहमदनगर - कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी नापिकी तर कधी शेत मालाला भाव नाही. महाराष्ट्रातील शेतकरी हा या सर्व समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तरुणांनाही शिक्षण घेऊन नोकऱ्या नाहीत. शेतात देखील कष्ट करून पिक घेतले तरी शेतमाला भाव मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. या सगळ्या चक्रव्युहातून ढोकरी येथील एकनाथ शेटे नावाच्या तरुण शेतकऱ्याने मार्ग काढला होता.
शेतीत वेगवेगळ्या प्रयोगाने शेटे यांनी परिसराचे लक्ष वेधून घेतले. एक एकरात सुमारे २५ लाख रुपये खर्च करून शेडनेट उभारले. त्यात या वर्षी मसालिया व बचाटा ही ढोबळी मिरचीचे पिक घेतले. संपूर्ण कुटुंब आणि इतरही मजूर येथे राबत होते. उत्पन्नाची मोठी आशा होती. शहरातील पाच मोठ्या मॉल्स बरोबर करार करताना पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील मिरची देण्याची बोलणी सुरु होती. सध्यस्थितीला प्रत्येक झाडाला अंदाजे पाच किलो ढोबळी मिरची लगडलेल्या आहेत. यातुन साधारणपणे चाळीस ते पन्नास टन उत्पन्न अपेक्षित होते.
हेही वाचा... अखेर दिवे लावलेच ! पंतप्रधानांचे आवाहन; एकजुटीचे दिवे लावण्याचा नादात दोन घरे पेटली
गेल्यावर्षी या मिरचीला प्रति किलो १५० रुपये भाव होता. पॉलीहाऊसच्या दर्जाचे उत्पन्न या तरुणाने घेतले आहे. ढोबळीच्या पिकासाठी या तरुण शेतकऱ्याने जवळपास साडे तीन ते चार लाख रुपये खर्च केला आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे देशात जी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे सर्व मॉल, हॉटेल बंद झाले आणि या तरुण शेतकऱ्याचा हिरमोड झाला. हा दर्जेदार शेतमाल आता या शेतकऱ्याला मातीमोल भावाने द्यावा लागणार असून त्याचा झालेला खर्चही निघणार नाही. हे सर्व सांगत असताना, 'रात्रभर झोपही येत नाही. झालेला खर्च कसा फेडायचा, हा प्रश्न असून सरकारने आमच्या सारख्या शेतकऱ्याला मदत करावी' असे एकनाथ शेटे हा तरुण सांगत आहे.