अहमदनगर - सोमवारी 2 मार्चला एका महिलेला पतीसह विवस्त्र करून मारहाण करण्याची घटना समोर आली होती. मात्र, जुन्या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी आणि जमिनीच्या वादातून नातेवाईकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पती-पत्नीने स्वत:ला विवस्त्र करून मारहाण केला जात असल्याचा व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. इतर तीन ओळखीच्या व्यक्तींकडून संगनमताने हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती या महिलेच्या पतीने दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता या महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित पत्नी, नारायण मतकर, गणेश सोपान झिरपे, अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे असे पाच आरोपी या बनावट व्हिडिओ प्रकरणात आहेत. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिला आणि तिच्या पतीला पळवून नेऊन विवस्त्र करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी पीडित महिलेचा सख्खा भाऊ, दीर, चुलत सासरे आणि इतर अशा दहा जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाचा तपास केला असता त्यात त्यांना याबद्दल संशय आला. म्हणून पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा - हे कायद्याचे राज्य आहे का.. ? बलात्कार पीडितेला पतीसह विवस्त्र करून अमानुष मारहाण, अंगावर ओतले पेट्रोल
यानंतर आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी केल्यानंतर हा बनाव रचल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडितेच्या पतीला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
असा बनवला प्लॅन -
पीडित महिलेच्या पतीने पाथर्डीतून तीन मित्रांना बोलवून घेतले होते. त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये दारुची पार्टी दिली आणि पत्नी आणि त्यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ तयार करण्याचा प्लॅन सांगितला. ते तिघेही तयार झाले होते. त्यानंतर स्टेशन रोड येथील एका शाळेतील खोलीमध्ये रात्रीच्या दरम्यान व्हिडिओ तयार करण्याचे ठरले. त्यानुसार निर्मनुष्य ठिकाणच्या एका खोलीत जाऊन हा व्हिडिओ बनविण्यात आला, असे पीडित महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले. जमिनीच्या विक्रीच्या वादातून नातेवाइकांना फसविण्यासाठीच हे कुंभाड रचण्यात आल्याचेही उघड झाले आहे.