अहमदनगर- महापौर निवडीवेळी २८ डिसेंबरला भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरमधील राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. प्रगेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांचा आग्रह टाळत नाहीत. त्यांच्या आग्रहाखातर सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मोदींनी जाहीर सभा घेतलीच नाही. अशा वजनदार पक्षअध्यक्षांचा आदेश डावलण्याचे धारिष्ट या नगरसेवकांनी दाखवले होते. नगरमधील या घडामोडी थोड्याशा विपरीतच आहेत.
२०१९ च्या लोकसभा आणि लागूनच आलेल्या विधानसभा निवडणुका पाहता मोदी विरोध हा आघाडीचा असलेला अजेंडा होता. मात्र,२८ डिसेंबर २०१८ ला पक्षाध्यक्षांचा आदेश डावलण्याचे धारिष्ट नगरमधील राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी दाखवले. मात्र, हे धारिष्ट म्हणजे एक प्रकारे पवार आणि पक्षासाठी त्यांनी दिलेले मोठे आव्हान होते. नगरसेवकांच्या या कृतीबाबत माध्यमांना काय उत्तर द्यायचे आणि त्यातून जनतेत काय संदेश जाईल, यावरून पक्षाची मोठी कोंडी झाली होती. त्यावर मार्ग काढत अखेर पक्षाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आणि पक्षादेश डावलणाऱ्या सर्वच्यासर्व अठरा नगरसेवकांना निलंबित केले.
मात्र, जगताप हाच पक्ष मानणाऱ्या त्या नगरसवेकांना 'पक्ष नेतृत्वाने(सग्राम जगताप)' पुढच्या' संग्रामासाठी' अभय दिले आहे. आता हाच 'संग्राम' राष्ट्रवादीने लोकसभेच्या मैदानात उतरवला आहे आणि तोही मोठ्या साहेबांना कधी काळी राजकीय आणि न्यायलीयन कैचीत पकडणाऱ्या दिवंगत बाळासाहेब विखेंच्या नातवा विरोधात. राजकारण कसे बदलते आणि त्या नुसार भूमिकाही बदलाव्या लागतात याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून नगर दक्षिण लोकसभेच्या रण'संग्रामा'कडे पाहावे लागेल.
निलंबन मागे.. सर्व आपलेच -जयंत पाटील
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी या जागेवर दावा केला. अर्थात गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर दक्षिण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे आहे. उत्तरेमध्ये राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसी नेते असल्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादीचे तीन आमदार असलेला अहमदनगर दक्षिण मतदारसंघावर विखे परिवाराने डोळा ठेवला. कारण शिर्डी मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळेच नगर दक्षिण मतदार संघात राजकीय कुरघोडीच्या राजकारणाला या ठिकाणी वेग आला आहे.त्यातुनच ते सर्व आपलेच असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी त्या नगरसेवकांवरील कारवाई मागे घेतली.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा विजय हा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातूनच स्वतः पवार किंवा जयंत पाटील नाराज असतानाही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या नगरसेवकांना पक्षात पवार घेतले आहे. तसेच शहरात संग्राम जगतापांचे प्राबल्य असल्याने त्या १८ ही नगरसेवकांना संग्राम याच्या विजयासाठी मैदानात उतरवले आहे. वास्तविक हे पक्ष विचारधारा आणि संकेत या विरोधात जाऊन असले तरी एक राजकीय अपरिहार्यता म्हणून याकडे राजकीय निरीक्षक नक्कीच पाहत आहेत.
हे नगरसेवक केले होते निलंबित-
1) संपत बारस्कर
2) सागर बोरुडे
3) दिपाली बारस्कर
4) विनीत पाऊलबुद्धे
5) सुनील त्रिंबके
6) समद खान
7) ज्योती गाडे
8) शोभा बोरकर
9) कुमार सिंह वाकळे
10) रूपाली पारगे
11) अविनाश घुले
12) परविन कुरेशी
13) शेख नजीर शेख अहमद
14) प्रकाश भागानगरे
15) मीना चोपडा
16) गणेश भोसले
17) शितल जगताप (आ.संग्राम जगताप यांच्या पत्नी)
18) मीना चव्हाण