अहमदनगर - श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील प्राचीन बाळेश्वर, निझर्णेश्वर व खांडेश्वर येथील शिवमंदिरात मोठ्या संख्यने शिवभक्त आले होते. या सर्व प्रमुख शिवमंदिरांच्या येथे सोमवारी सकाळपासूनच भाविकांची रेलचेल पहायला मिळाली.
तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी शिवमंदिरात हजेरी लावून शिवपिंडीचे दर्शन घेतले. बाळेश्वर येथील बाळेश्वर मंदिरात, खांडगावच्या खांडेश्वर, कोकणगाव येथील निझर्णेश्वर ही सर्व मंदिरे भक्तांच्या उपस्थितीने फुलून गेली होती. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गाभाऱ्यापुढील सभामंडपात रांगा लावल्या होत्या.
बाळेश्वर हे मंदिर पांडवकालीन असून येथे संगमनेर, जुन्नर, अकोले तालुक्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावणात अनेक भाविक उपवास करतात. यामुळे सोमवारी मंदिराच्या ठिकाणी महाप्रसाद म्हणून फराळाचे वाटप करण्यात आले होते.