अहमदनगर- जिल्ह्यातील एका युवक शेतकऱ्याने आपल्या 65 एकर शेतीत विज्ञान तंत्रज्ञानरूपी रसायन अवशेषमुक्त व्यावसायिक अशा जागतिक दर्जाच्या शेतीचा आदर्श उभारला आहे. शेतीत नवे प्रयोग ( New experiments in agriculture ) तंत्रज्ञान पाहण्यासाठी आपण इस्राईल नेदरलॅंड, ब्राझील आदी देशांना भेटी देतो. पण हेच जागतिक दर्जाचं शेती व्यवस्थापन आपल्याच मायभूमीत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील निघोजच्या राहुल रसाळ यांच्या शेतीत अनुभवता येतो.
सध्या शेतीत काही राहिलेला नाही अशी हतबलता व्यक्त करणारे युवा शेतकरी व्यवसाय नोकरीला पसंती देत शहरांची वाट धरणारतात. समस्यांशी लढत शेतीत तगून राहणारे, शहरांकडून शेतीकडे वळणारे अशा समस्त वर्गांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुल रसाळ ( Rahul Rasal ) हे नवचैतन्याचं आहे. अन्य व्यवसाय नोकरीपेक्षा शेती-मातीतच पैसा वैभव समृद्धी आहे. कुटुंबाचं सुखसमाधान शांती आरोग्य आहे. ब्राझील चिली, स्पेन, नेदरलॅंड आदी सुमारे सात- आठ देशांना त्यानं भेट दिली आहे. कमी वयात कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांचा तांत्रिक सल्लागार सदस्य होण्याचा मान राहुलने पटकाविला असून विविध पुरस्कारांसह शास्त्रज्ञांनी पाठ थोपटली आहे.
65 एकरांतील शेतीत पिके - आंतरराष्ट्रीय दर्जाची शेती राहुलने आपल्या 65 एकरांतील शेतीत 20 एकर द्राक्षे, त्यात करटुल्याचे आंतरपीक, 15 एकर डाळिंब, 10 एकर टोमॅटो व उर्वरित क्षेत्रात भाजीपाला अशी पीक पद्धती आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून शेतीत काम सुरू करून राहुलचा सुमारे 16 वर्षांचा दांडगा अनुभव तयार झाला आहे. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातून ‘बीएस्सी ॲग्री’च्या चौथ्या वर्षाला तो शिकत आहे. मात्र ज्ञान अनुभव यांचा मेळ घातला तर लौकिक अर्थानं त्यानं पीएचडी पूर्ण केली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
शेतीची वैशिष्ट्ये - 1 ) संपूर्ण शेतीत रासायनिक अवशेष मुक्त ( रेसीड्यू फ्री ) अन्नाची निर्मिती. त्या दृष्टीने व्यवस्थापन. डेल्टा टी संकल्पनेवर आधारित फवारण्यांचे नियोजन.
2 ) पिकेल ते विकेल आवक नसेल त्यावेळी बाजारात आणेल’ या संकल्पनांवर आधारित व्यावसायिक, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती.
3 ) विज्ञानाचा पाया बळकट. त्यातील तत्त्वे, संकल्पनांचा पुरेपूर वापर काल पाऊस भरपूर पडला, जमिनीत पीएच जास्त आहे अशी मोघम भाषा नाही. तर दोन दिवसांत 20 मिलिमीटर पाऊस झाला. पाण्याचा टीडीएस 2000 आहे. मातीचा पीएच साडेसात आहे अशा शास्त्रीय युनिटमध्ये राहुल बोलतो.
4 ) माती, पाणी, सूर्यप्रकाश, ब्रिक्स, टीडीएस, ईसी, पाण्यातील ऑक्सिजन अशा विविध बाबी मोजणाऱ्या नऊ ते दहा शास्त्रीय उपकरणांचा सज्ज ताफा.
5 ) शेतीचे संपूर्ण यांत्रिकीकरण. सबसरफेस ठिबक, स्वयंचलित वेदर स्टेशन, ‘वेदर डाटा’ संकलन केंद्र, सेंद्रिय स्लरी यंत्रनिर्मिती.
6 ) स्वतःची प्रयोगशाळा उभारून ट्रायकोडर्माचे दर्जेदार उत्पादन.
7 ) प्रत्येक पिकाची प्रति एकरी अधिक उत्पादकता. निर्यातक्षम, ए ग्रेड दर्जा. त्यामुळे दरही तसाच. डाळिंब 150 ते 200 रुपये प्रति किलो.
8 ) मातीची सुपीकताही जपली. सेंद्रिय कर्ब वाढवला. त्यासाठी सेंद्रिय खतांची निर्मिती. त्यासाठी देशी गोसंगोपन.
10 ) उत्पादन खर्च कमी करण्यावर भर.
रसाळ यांच्या शेतीपद्धतीची माहिती- शेतीत निदान डायग्नॉसिस ही बाब सर्वांत महत्त्वाची असते कारण ते अचूक असले तर त्यावरून उपायही अचूक करता येतात. राहुल रसाळ यांनी शेतीतील विविध बाबीं तपासण्यासाठी विविध उपकरणे सज्ज ठेवली आहेत. त्यावरून विविध बाबींचे निदान करता येते. राहुल यांच्या ताफ्यातील शास्त्रीय उपकरणे. लक्स मीटर राहुल यांनी द्राक्ष, डाळिंब, कारले, टोमॅटो अशी पीकपद्धती निवडली. त्यामागे केवळ बाजारपेठ एवढाच नव्हे तर विज्ञानाचाही आधार होता. कोणते देश कोणत्या पिकांमध्ये का आघाडीवर आहेत. त्यांना दर्जेदार उत्पादन मिळण्यामागील कारणे काय हे अभ्यासताना त्यांना लक्स ही संकल्पना भावली.
लक्स म्हणजे काय ? ठरावीक क्षेत्रासाठीचे प्रकाशाचे लाइट मोजमाप किंवा तीव्रता म्हणजे लक्स शास्त्रीय भाषेत एक लक्स म्हणजे प्रति चौरस मीटर क्षेत्र वा पृष्ठभागासाठी एक ल्युमेन एवढा पडलेला प्रकाश मग तो सूर्यप्रकाश असेल किंवा अन्य कोणता स्रोत एखाद्या मेणबत्तीचा एक मीटर दूर अंतरापर्यंत जो प्रकाश पडतो तो एक लक्स प्रमाणात मोजला जातो. लक्स युनिटमुळे प्रकाशाची दिशाही कळण्यास मदत होते. लक्स मीटरचा उपयोग राहुल यांच्या ताफ्यात लक्स मीटर हे महत्त्वाचे उपकरण आहे. शेतीत आघाडीवरील देशांमध्ये असलेले तापमान व तेथील पिकांना वर्षभर किती लक्स सूर्यप्रकाश मिळतो. त्या तुलनेत आपल्या शेतात वर्षभर विविध वेळी उपलब्ध असलेले तापमान व लक्स यांचा अभ्यास राहुल यांनी केला. कारण त्यातून झाडाची वाढ प्रकाश संश्लेषण क्रिया झाडाकडून अन्ननिर्मिती आदी बाबी स्पष्ट होतात.
दक्षिण अमेरिकेतील देश चिली पेरू, दक्षिण आफ्रिका इक्वेडोर पृथ्वीच्या अशा भौगोलिक स्थानावर आहेत की त्यांना वर्षभर प्रखर व अधिक काळ प्रकाश एक लाख 20 हजार ते 30 हजार लक्स मिळतो असल्याचं रसाळ म्हणाले आहे. तसेच द्राक्ष किंवा अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते. अन्य देशांना भेटी देताना लक्स मीटर डिजिटल पोर्टेबल ह्युमिडीटी मापक सोबत ठेवतो. तेथील शेतात त्याचा वापर करून पाहतो. डीओ मीटर - सेंद्रिय स्लरी तयार करताना त्यात विरघळलेला ऑक्सिजन व त्या अनुषंगाने लाभदायक जिवाणूंच्या प्रमाणाबाबत जाणून घेण्यासाठी डिसॉल्व्ह ऑक्सिजन (डीओ) मीटरचा उपयोग होतो. ब्रीक्स मीटर याद्वारे सकाळी व संध्याकाळी पानांमधील साखरेचे रीडिंग घेतले जाते. दोन्ही वेळेतील फरक पाहून ‘बोरॉन’ची कार्यक्षमता जाणून घेता येते. त्यानुसार वापर करता येतो. वॉटर पीएच मीटर द्रावणासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पीएच (सामू) समजतो. कीडनाशके वा रसायने द्रावण वा बोर्डो तयार करण्यासाठी त्याची मदत होते. वॉटर ईसी मीटर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी पाण्याचा ईसी एक ते दीडपेक्षा जास्त राहिला तर जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे खतांचे प्रमाण. पाण्याची गुणवत्ता अभ्यासण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होतो.
जमिनीतील जिवाणूंची संख्या - सॉइल पीएच मीटर मातीचा पीएच व मातीचे तापमान मोजता येते. सॉइल ईसी मीटर यातही मातीच्या ईसीसह तापमान समजते. टीडीएस मीटर आरओ’च (रिव्हर्स ऑसमॉसिस) पाणी राहुल वापरतात. त्यातील ‘टीडीएस’चे (टोटल डिसॉल्व्ह सॉलीड्स- एकूण विरघळलेले घन पदार्थ) प्रमाण 10 मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत खाली आणले जाते. कीडनाशके वा खते फवारणीसाठीच्या द्रावणाचा टीडीएस मोजण्यासाठी या उपकरणाची गरज पडते. डिजिटल वेदर मेजरमेंट डिव्हाइस हॅंड हेल्ड यात आर्द्रता, तापमान, ड्यू पॉइंट, डेल्टा टी हवेचा वेग आदी बाबी समजतात. वरील उपकरणांमध्ये सेन्सर्स असतात. मातीत ती खोचून रीडिंग घेता येते. जमिनीची क्षारता, अन्नद्रव्यांचे अपटेक सोडिअम आदी बाबी त्याद्वारे समजून कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात द्यायचे त्याचे नियोजन करता येते. जमिनीतील जिवाणूंची संख्या वा कार्यक्षमता टिकवायची असेल तर ठिबक संचातील ‘ड्रीपर’मधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पीएच संतुलित असावा. साडेसहा ते सात अशा बाब तपासण्यासाठीही वरील उपकरणे उपयोगी ठरतात. फायदे वरील उपकरणे डिजिटल व पोर्टेबल आहेत. त्यामुळे कोणत्याही प्लॉटमध्ये रीडिंग घेणे सोपे होते. अशा उपकरणांच्या वापरातून विद्राव्य खतांचा अनावश्यक वापर थांबून त्यात 30 ते 40 टक्क्यांची बचत झाली. कीडनाशकांचाही योग्य परिणाम मिळतो. जलस्रोतांत काही वेळा जड धातूंचा आढळही उदा. शिसे असतो. त्याचेही अवशेष आपल्या शेतीमालात येणार नाहीत याची काळजी घेता येते असे राहुल याने सांगितले आहे.
यांत्रिकीकरणावर भर - राहुल यांची 65 एकर शेती असल्याने मजूरटंचाईवर मात करण्यासाठी राहुल रसाळ यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. ठरावीक कामांसाठीच मजुरांची गरज भासते. ट्रॅक्टरचलित ब्लोअर, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा आहेच. द्राक्षात 2006 मध्येच सबसरफेस व डबल लॅटरल पद्धतीचा वापर सुरू केला. आरओ प्लांटची उभारणी शेतीला कुकडी कॅनॉलचे पाणी आहे. मात्र मुरमाड जमीन असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. पाऊस कितीही झाला तरी तेवढा फायदा होत नाही. प्रत्येक उन्हाळ्यात पाणी बाहेरून आणावे लागते. राहुल सांगतात की शेतीत केमिस्ट्री चा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण उत्पादन खर्चातील 70 ते 80 टक्के खर्च कीडनाशके व विद्राव्य खतांवर होतो. आमच्या पाण्याचा पीएच साडेआठ, ईसी 2 तर टीडीएस 2500 मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत आहे. जमिनीत कॅल्शिअम जास्त आहे. फेरस सल्फेट जमिनीला दिला तर कॅल्शिअमसोबत रिॲक्शन होते आणि ‘फेरस’ झाडाकडून शोषला जात नाही. त्यामुळे पिवळकी येते. पाण्याचा टीडीएस जास्त असेल व मेटॅलॅक्झीलयुक्त बुरशीनाशक वापरले तर रिॲक्शन होऊन परिणाम अत्यंत कमी मिळतो. अशावेळी फवारण्या वाढविल्यास रेसीड्यू वाढतो आणि परिणाम तर मिळतच नाही.
आरओ प्लांट रिव्हर्स ऑसमॉसिस उभारला - जगभरात रासायनिक प्रयोगांमध्ये डिस्टिल वॉटर ऊर्ध्वपातीत पाणी वापरले जाते. कारण त्यात क्षार नसतात. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून आम्ही आरओ प्लांट रिव्हर्स ऑसमॉसिस उभारला आहे. त्याद्वारे पाण्याचा टीडीएस 10 मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत खाली आणता येतो. कीडनाशक, विद्राव्य खते यांच्या फवारणीसाठी त्याचा वापर करतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही गरजेचे आहे. कारण परिसरात रासायनिक औद्योगिक प्रकल्प असतील तर पाणी प्रदूषणाचा धोका असतो. त्यामुळे शुद्ध पाणी वापरायला हवे. आम्हाला दिवसाला शेतीत सहा हजार लिटर पाणी लागते. एवढे पाणी साठविण्याचा खर्च वाढतो. त्या तुलनेत पाणी आरओ युक्त करण्याचा खर्च 20 पैसे प्रति लिटर असतो.
मालात कीडनाशक अंशाचा शून्य आढळ - मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब राहुल यांनी एकरी पीक उत्पादकतेबरोबर मातीची उत्पादकता. सुपीकता वाढविण्याकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. राहुल सांगतात, की 2006 मध्ये शेती करू लागलो तेव्हा मातीचा सेंद्रिय कर्ब 0.4 होता. सध्या तो 1.8 टक्का इतका चांगला आहे. प्रयोगशाळेत माती, पाणी, पान-देठ परिक्षण करून पीएच, ईसी, टीडीएस, सेंद्रिय कर्ब आदी बाबी तपासल्या आहेत. मातीतील सेंद्रिय घटक तपासण्यासाठी एक प्रयोगही घरच्याघरी करतो. शेतातील एक किलो माती घेऊन उन्हात सुकवायची ओव्हनमध्ये 200 अंश सेल्सिअस तापमानाला दोन तास ठेवायची. पूर्वीचे व नंतरचे वजन यातील फरक पाहायचा त्यातून सेंद्रिय घटकांचे प्रमाण समजते.
देशी पशुधन - राहुल यांच्याकडे 9 ते 10 साहिवाल गायी. गीर. खिलार असं देशी पशुधन आहे. स्लरीसाठी त्यांच्या शेण-मूत्राचा वापर होतो. अनॲरोबिक (ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत) व ॲरोबिक (ऑक्सिजनच्या उपस्थितीत) अशा दोन प्रकारेच्या स्लरी तयार केल्या जातात. ॲनॲरोबिक पद्धतीत सेंद्रिय घटकांचे उदा. शेणखत वाया गेलेले अन्नपदार्थ यांचे विघटन जिवाणू ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत करतात. या पद्धतीत जिवाणूंचे विविध समुदायही असू शकतात. या पद्धतीत गोठा धुतलेले पाणी, शेण, गोमूत्र एका टाकीत संकलित केलं जातं. राहुल देशी दुधाच्या ताकाचा वापरही टाकीत वापरतात. त्यात लॅक्टी क ॲसिड जिवाणू असतात. त्यांचाही विघटनात उपयोग होतो. किण्वन प्रक्रिया फरमेंटेशन आठ दिवसांसाठी होते.
जैवइंधनाचाही फायदा - जैविक विघटन होण्यासह या प्रक्रियेत जैवइंधनवायू (मिथेन) तयार होतो. त्यासाठी बायोगॅस यंत्रणा उभारली आहे. इंधनाचा उपयोग स्वयंपाक निर्मितीसाठी होतो. तयार झालेली स्लरी पुढे ‘बॅलॅंसिग टॅंक’मध्ये एका पाइपद्वारे व तेथून दहा हजार लिटर क्षमतेच्या ॲरोबिक स्लरी टाकीत सोडली जाते. पुढे ऑक्सिजनच्या उपस्थितीत वाढणारे जिवाणू या स्लरीत कार्य करतात. पाच पीपीएम ऑक्सिजन जनरेट करून या टाकीला ‘एरियटर’द्वारे ऑक्सिजन पुरवला जातो. तो हवेचा कृत्रिम धबधबा वा स्रोत तयार करतो. आठ दिवस ही क्रिया सुरू ठेवली जाते. गरजेनुसार वा दर 8 दिवसांनी एकरी 500 लिटरच्या हिशेबाने शेताला दिली जाते. स्लरी देण्यासाठी यंत्राची निर्मिती राहुल यांनी स्लरी देण्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्राची निर्मिती केली आहे. ट्रॅक्टरच्या मागे स्लरीटॅंक व मडपंप आहे. ट्रॅक्टर बागेत दोन ओळींमधून चालतो. पुढील बाजूस आडवी पाइप आहे. त्यातून डावीकडे व उजवीकडे झाडांजवळ स्लरी पडत जाते. केवळ एक व्यक्ती चालक पुरेशी होते. अशा वापरातून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
प्रयोगशाळा - राहुल रसाळ यांनी शेत परिसरात प्रयोगशाळा उभारली आहे. त्यामध्ये ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचे ताजे व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. त्यामुळे परिणाम प्रभावी मिळतो. यामुळे बाहेरून ट्रायकोडर्मा खरेदी करण्याची गरज संपली असून त्यावरील खर्चातही बचत झाली आहे. असे होते ट्रायकोडर्माचे उत्पादन बांधावरील प्रयोगशाळा ही पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांची संकल्पना आहे. राहुल यांनी त्यांच्याकडून ट्रायकोडर्मा निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले. सुमारे सहा महिने अभ्यास केला. प्रयोगशाळेत गॅस शेगडी, पेट्री प्लेट्स, टेस्ट ट्यूब्ज, बन्सेन बर्नर, इनॉक्यूलेटिंग नीडल, ऑटोक्लेव्ह स्वयंपाकासाठीचा किंवा इडलीचा प्रेशर कुकरही चालतो. कोनिकल फ्लास्कस, मिश्रण ढवळण्यासाठी रोटरी शेकर या उपकरणांची गरज असते. एका शेकरमध्ये 16 फ्लास्क बसतात. प्रति फ्लास्कमध्ये एका एकरासाठी पुरेशा 200 मिलि ट्रायकोडर्माचे उत्पादन होते. म्हणजेच 48 तासांच्या बॅचमध्ये 16 फ्लास्कद्वारे 16 एकरांसाठी लागणारी ट्रायकोडर्मा बुरशी उत्पादित होते. पण ही एकरी 200 मिलि बुरशी शुद्ध स्वरूपातील असते. त्यावर फॉर्म्यूलेशन व फंगल मेडिया (खाद्य) प्रक्रिया करून प्रति लिटरसाठी द्रावण तयार केले जाते.
प्रयोगशाळेचे महत्त्व फायदे - राहुल सांगतात की जमिनीतील फ्युजारियम, कॉलर रॉट आदी विविध रोगांचे नियंत्रण ट्रायकोडर्माद्वारे आम्ही करतो. रासायनिक अवशेषांचे विघटन करण्यासाठीही ही बुरशी उपयोगी ठरते. पुढील काळात प्रयोगशाळेचा मोठ्या स्तरावर विस्तार करणार असून डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून मेटारायझियम, स्युडोमोनास आदी मित्रबुरशीही बनविण्याचा मानस आहे. राहुल सांगतात, की पूर्वी आम्ही विकतचा ट्रायकोडर्मा वापरायचो. स्लरीसाठी तो 200 लिटरच्या बॅरेलमध्ये ओतायचो. दोन किलो गूळ, एक लिटर ट्रायको घेऊन बांबू काठीच्या साह्याने मिश्रण आठ दिवस ढवळत राहायचो. बाजारातील ट्रायको हा काही दिवसांपूर्वी बनविलेली असू शकतो. आता आमच्याच प्रयोगशाळेत 48 तासांत बनवितो आणि 50 व्या तासाला तो शेतात जाऊ शकतो. ट्रायकोडर्माचे ‘काउंट’ देखील योग्य मिळतात. ठिबक किंवा फवारणीद्वारे आठवड्यातून एकदा त्याचा वापर होतो साठ एकरांसाठी ट्रायकोडर्मा विकत आणण्याचा वार्षिक खर्च 60 एकरांसाठी सुमारे एक लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी नसायचा. आता प्रयोगशाळा उभारण्यासाठी गुंतवणुकीचाच काय तो सुरुवातीचा 55 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च आहे. आठवड्यातून दोन तास जरी निर्मिती केली तरी संपूर्ण शेतासाठीची गरज पूर्ण होऊ शकते. त्याचे परिणाम उत्पादन व गुणवत्तेच्या रूपाने दिसून आले आहेत. फवारणीसाठी डेल्टा टी चार्टचा उपयोग कीडनाशक फवारणीचा ‘रिझल्ट’ अचूक मिळावा असा राहुल रसाळ यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील ‘डेल्टा टी चार्ट’चा संदर्भही ते वापरतात. हा चार्ट म्हणजे सापेक्ष आर्द्रता व तापमान यांचा परस्परसंबंध दाखवणारा आलेख व व त्यावरून फवारणीसाठीची अनुकूल स्थिती दर्शविणारा असतो. आपल्या हवामान केंद्रातील हवामान घटकांच्या नोंदींशी त्यांचा मेळ घालून फवारणीची वेळ निश्चित करता येते.
कीडनाशक योग्यवेळी व योग्य प्रकारे फवारा- तापमान 25 अंश, आर्द्रता 60 टक्के असेल, तर चार्टमधील पिवळ्या रंगानुसार ही फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे. तापमान 25 अंश व आर्द्रता 40 टक्के असेल, तर ती चार्टमधील राखाडी रंगाला ती ‘मॅच’ होते. मार्जिनल कंडिशन तापमान तेच मात्र आर्द्रता 30 टक्क्यांवर गेली. तर ‘डेल्टा टी कंडिशन फवारणीसाठी अनुकूल नाही. राहुल सांगतात. की फवारणी यंत्राच्या नोझल्समधून बाहेर पडणारे थेंब अत्यंत सूक्ष्म असतात. तापमान अधिक व आर्द्रता कमी असल्यास फवारलेल्या द्रावणाचे बाष्पीभवन होऊन ते वाया जाते. कीडनाशकांवरील पैसेही वाया जातात. कीडनाशकाचे कव्हरेज पिकाला योग्य मिळाले पाहिजे. आंतरप्रवाही रसायन वनस्पतीच्या अंतर्भागात गेले पाहिजे. अशावेळी ‘डेल्टा टी’चा आधार घेतो. कीटकनाशके संध्याकाळनंतर, बुरशीनाशके सकाळी व ‘पीजीआर’ वर्गातील उत्पादनांची संध्याकाळी चार वाजता फवारणी करतो. संध्याकाळनंतर कीटकनाशक फवारण्याचा फायदा म्हणजे कीटक आपली जागा सोडू शकत नाहीत. रात्री बल्बच्या प्रकाशात ते बाहेर पडले तरी नियंत्रण होते. दिवसा फवारणी केल्यास रसायनाच्या गंधाने ते अन्यत्र स्थलांतर करू शकतात. काही वेळा अपेक्षित आर्द्रता 50 टक्के रात्री 8 ते 9 वाजता मिळते. मग रात्री उशिरापर्यंतही फवारणी सुरू ठेवली. कीडनाशक योग्यवेळी व योग्य प्रकारे फवारल्यास त्याची संख्या आटोक्यात राहते. योग्य डोसमध्ये परिणाम मिळतो. मालात ‘रेसिड्यू’ राहत नाहीत. ‘कॉम्बिनेशन’ नाही राहुल सांगतात. की आम्ही कीडनाशके एकमेकांत मिसळून वापरत नाही. प्रत्येकाची स्वतंत्र फवारणीच घेतो. भले दिवसाला दोन- तीन स्प्रे झाले तरी चालतील. कीडनाशक वापरताना मजुरी, डिझेल आदी खर्च, मेहनतही वाढेल. पण योग्य रिझल्ट साठी ते गरजेचे आहे.
डाळिंब शेती - राहुल रसाळ यांनी मात्र आपल्या 15 एकरांत भगवा डाळिंब बागेत निर्यातक्षम उत्पादनाचा आदर्श तयार केला आहे. पूर्ण बाग ‘रेसिड्यू फ्री’ तत्त्वावर आणि ‘अनारनेट’ नोंदणीकृत आहे. उत्कृष्ट कॅनॉपी व निरोगी बागेत एकसारख्या आकाराची, आकर्षक भगव्या रंगाची अनोखी चमकदार डागविरहित लगडलेली फळे दिसतात. टिकवणक्षमताही चांगली आहे. सन 2016 मध्ये लागवड असलेल्या बागेत तिसऱ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. तेलकट डाग रोगाला राहुल सांगतात की डाळिंब हे उष्णकटीबंधीय फळ आहे. पाणी जास्त झाल्यास नत्र जास्त होतो आणि तेलकट डाग रोग वाढतो. माझ्या बागेत एकूण चार हजार झाडांमध्ये 35 ते 40 झाडांमध्येच कुठेतरी त्याची लक्षणे दिसू शकतील. रोगाचे बहुतांश नियंत्रण पाणी, अन्नद्रव्ये व नत्र-कर्ब गुणोत्तर जोपासण्यातून केले आहे. डबल लॅटरल व प्रति 40 सेंटिमीटरला 1.6 लिटरचे डिस्चार्ज असलेले ड्रीपर आहेत. 8 ते 9 दिवसांतून फक्त 20 ते 25 मिनिटे पाणी देतो. ‘डेल्टा टी तंत्रा’द्वारे रात्री 10 वाजता फवारणी सुरू होऊन ती मध्यरात्रीपर्यंत चालते.
डाळिंब फळाचे वजन - 300 ते 600 ग्रॅमपर्यंत वजनाची फळे 60 ते 65 टक्के प्रमाणात. 20 टक्के माल 200 ग्रॅमपेक्षा जास्त तर 10 ते 15 टक्के माल हा 100 ग्रॅम वजनापुढील. एकरी आठ ते नऊ टन उत्पादन. निर्यातक्षम मालाची इंग्लंड व नेदरलॅंडला निर्यातदारांमार्फत निर्यात. त्यास किलोला 240 ते 300 रुपये दर.
पीकचे व्यवस्थापनात - कारले असे पीक की बाराही महिने दर राहतात. वर्षभरात किलोला 25 ते 30 रुपयांच्या खाली दर शक्यतो जात नाहीत असा अनुभव. दहा बाय तीन फुटांवर लागवड. एकरी सुमारे 1400 झाडे. ट्रायकोडर्माचा ठिबकमधून वापर. त्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. ताज्या जैविक घटकांचा वापर केल्याने कॉलर रॉट, फ्युजारीयम, अल्टरनारिया आदी रोगांपासून मुळांचे संरक्षण. त्यामुळे अन्नद्रव्यांचा ‘अपटेक’ही चांगला. खोडांपाशी प्रति झाड एक लिटर या प्रमाणात आठवड्यातून एकदा सेंद्रिय स्लरी. पॉली मल्चिंगचा वापर. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे सेंद्रिय स्लरीचा प्रत्येक मल्चिंग छिद्राजवळ (स्पॉट ॲप्लिकेशन) वापर. ट्रॅक्टरचालकासह दोन व्यक्तींची गरज. एकरी दोन तासांत हे काम होते. या पिकात मॅग्नेशिअम नायट्रेटचा वापर जास्त. शिवाय 19.19.19 युरिया व सूक्ष्म अन्नद्रव्येही देण्यात येतात. सल्फेट स्वरूपातील घटक ठिबकद्वारे. फॉस्फरस व पोटॅशचे प्रमाण तुलनेने कमी लागते. फॉस्फरसचे प्रमाण वाढले तर कारल्याची फुगवण वाढते असा अनुभव. पांढरी माशी, अन्य रसशोषक, फळमाशी व विषाणूजन्य रोग या समस्या. दर अमावास्येला अंड्यातून पिलांची उत्पत्ती होते. त्यामुळे रात्री फवारण्या. किडींचे चांगले प्रभावी नियंत्रण. फळमाशीसाठी मिथाईल युजेनॉल ट्रॅपचा वापर. प्रति झाड 25 किलो, तर एकरी 20 ते 25 टन उत्पादन. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू. तिथून तीन महिने प्लॉट चालतो. त्यामुळे 15 ते 20 दिवस मार्केट पडले तरी पुढे भरून निघते. एकरी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न.
सेंद्रिय खत - शेणखताचा कुजवून वापर राहुल बिगर कुजवलेले काहीच जमिनीत वापरत नाहीत. सेंद्रिय खत वापरण्यापूर्वी ते जी प्रक्रिया करतात ती पुढीलप्रमाणे. 30 टक्के शेणखत, 30 टक्के कारखान्याचे बगॅस, 30 टक्के प्रेसमड अधिक डाळिंबासाठी 10 टक्के कारखान्याची राख तर अन्य पिकांसाठी (द्राक्षे, भाजीपाला) त्याऐवजी 10 टक्के पोल्ट्रीखत. डेपो लावून सूर्यप्रकाशाद्वारे या घटकांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यातून चांगली उष्णता उत्सर्जित होते. या प्रक्रियेमुळे मूळकुजीचा धोकाही कमी केला जातो. ज्या वर्षी वापर करायचा त्याच्या 9 ते 12 महिने आधी ही निर्मिती सुरू होते. म्हणजे वापरावयाच्या वर्षी तयार दर्जेदार ह्यूमस उपलब्ध होते. वापर- दरवर्षी. एकरी 20 ब्रास प्रति पीक. काढणीनंतर.
विदेशात जातो डाळिंब - उर्वरित ग्रेडचा माल मॉल, बांगला देश, कोलंबो व देशातील अन्य बाजारपेठांत जातो. तेथे 80.90 ते 110 रुपये सरासरी दर. वर्षभर पैसा देणारे हुकमी कारले कारले हे राहुल यांचे हुकमी व बाराही महिने तीन- चार एकरांत घेतले जाणारे पीक आहे. कारल्याला श्रावण वा सप्टेंबर काळात सर्वाधिक व हमखास दर असतात. त्यावेळी प्लॉट सुरू होईल असे लागवडीचे नियोजन असते. हे पीक मोठ्या प्रमाणात फारसे कोणी करीत नाही. अनेक शेतकरी ते पावसाळ्यात घेऊ शकत नाहीत किंवा कांदा व भुसार पिकांसाठी क्षेत्र राखीव असते. हा फायदा आम्हाला मिळतो असे राहुल सांगतात.
क्रिमसन रेड हे द्राक्ष बाग - एकच पीक पद्धतीत नैसर्गिक आपत्ती वा कोरोनासारख्या संकटात मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वर्षभर बहुविध पीक पद्धती निवडून (द्राक्षे, डाळिंब, कारले, टोमॅटो राहुल रसाळ यांनी ही जोखीम कमी केली आहे. त्यातून खेळते भांडवल व रोजचे ताजे उत्पन्न सुरू राहते. अर्थात, आर्थिक गणित पावसावर अवलंबून असते. प्रत्येक पिकात सरासरी किमान एक ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. शेतमालाचा ‘विंडो पीरियड’ सांभाळल्याने दर चांगले मिळतात. जागेवर येऊन व्यापारी खरेदी करतात. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या विभागानुसार पीक पद्धतीचा ‘पॅटर्न’ आखला पाहिजे, असे राहुल सांगतात लाल रंगाची पिके राहुल सांगतात की द्राक्षे, डाळिंब व टोमॅटो ही लाल रंगाची पिके आहेत. अशा फळांमध्ये ‘ॲटिऑक्सिडंट्स’ घटक चांगले असून त्यात प्रतिकारक गुणधर्म असतात. क्रिमसन रेड हे द्राक्ष वाण कर्करोगाला प्रतिकारक आहे. जगभरातील संशोधन प्रबंधांमधून याबाबत माहिती उपलब्ध आहे. ग्राहकही ते वाचत असतो आणि त्यादृष्टीने या शेतीमालाचे महत्त्व वाढत असते.
द्राक्ष लागवड अशी केली पाहिजे - करटुलीचे आंतरपीक नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान मोठे होते. खर्चही जास्त असतो. तो भरून काढण्यासाठी करटुली या रानभाजीचे आंतरपीक घेण्यात येते. कंद स्वरूपात मे मध्ये द्राक्ष बागेत सुमारे 10 बाय 5 फुटांवर लागवड होते. एकदा लागवडीनंतर कंद 7 ते 9 वर्षे शेतात राहू शकतो. दरवर्षी नवी लागवड करण्याची गरज नाही. सुमारे महिनाभरानंतर उत्पादन सुरू होते. शक्यतो ऑक्टोबर छाटणीपर्यंत उत्पादन घेतले जाते. त्यानंतर सारे लक्ष द्राक्षावर केंद्रित करता येते. तशी करटुली नोव्हेंबरपर्यंत किंवा तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत असेल तोपर्यंतही घेता येते. पुढे हे पीक सुप्तावस्थेत जाते. हंगामात आठवड्यातून दोन वेळा किंवा दर दोन -तीन दिवसांनी करटुलीची काढणी होते. राहुल म्हणतात की करटुली हे शेतकऱ्यांचे नियमित वा सरावाचे पीक नाही. नर व मादी रोपे वेगवेगळी असतात. ती ओळखू यावी लागतात. अलीकडे मात्र अनेकांनी लागवड सुरू केली आहे. मधुमेह, कर्करोग यांना प्रतिबंध करण्याचे गुणधर्म करटुलीत आहेत. एकरी एक हजारापर्यंत झाडे असल्यास दोन टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास मुंबई ही चांगली बाजारपेठ असून व्यापारी जागेवरून घेऊन जातात. 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते.
राहुलची कीर्ती आज राज्याच्या सीमेबाहेर पोहोचली - पारनेर तालुक्यातील निघोज येथील राहुल अमृता रसाळ या केवळ 30 वर्षे वयाच्या युवकाची कीर्ती आज राज्याच्या सीमेबाहेर पोहोचली आहे. शेतीतील नवे प्रयोग, तंत्रज्ञान पाहण्यासाठी आपण इस्राईल, नेदरलॅंड आदी विविध देशांचे दौरे करतो. पण प्रिसिजन फार्मिंग काटेकोर शेती व्यवस्थापनाचा अनुभव आपल्याला राहुलच्याच शेतीत घेता येतो. साधी राहणी मध्यम उंची व शरीरयष्टी, स्वभावात विनम्रपणा आणि शेतीचा रोजचा व्याप सांभाळून विद्यार्थ्यांप्रमाणे सातत्याने सुरू असलेला शेतीतला अभ्यास असं या युवकाचं व्यक्तिमत्त्व आहे.
कोण आहेत राहुल - वीस एकर वडिलोपार्जित शेतीचा विस्तार होऊन सुमारे 65 एकर शेती राहुल कसतो आहे. त्यात सुमारे 20 एकर द्राक्षे, त्यात करटुल्याचे आंतरपीक, 15 एकर डाळिंब, सहा- सात एकर टोमॅटो, तीन- चार एकर कारले व उर्वरित असा 10 एकर भाजीपाला अशी प्रमुख पीक पद्धती आहे. ‘पिकेल ते विकेल’ व आवक नसेल त्या वेळी बाजारात आणेल’ या संकल्पनांचा वापर करून त्याने शेती व्यावसायिक वा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. इयत्ता नववीत असल्यापासून मातीत उतरलेल्या राहुलचा आज शेतीत 16 वर्षांचा भक्कम अनुभव तयार झाला आहे. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने त्याने ‘हॉर्टिकल्चर पदवी नुकतीच घेतली आहे. वडिलांचा बांधकाम व्यवसाय आहे. लहान भाऊ सागर ‘बीई सिव्हिल आहे. आई संजीवनी, पत्नी स्वाती व छोटा चिरंजीव सिद्धार्थ असे राहुलचे कुटुंब आहे. जग फिरलेला माणूस जग फिरल्याशिवाय अन्य देश कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत याचे भान येत नाही. राहुलने 2013 च्या दरम्यान वयाच्या 16 व्या ते 17 व्या वर्षीच) इस्राईलचा दौरा केला. तेथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने पाहिली. जगातील नवे प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आपले स्पर्धात्मक देश कोणते, त्या दृष्टीने कोणती स्पर्धात्मक पीक पद्धती आपल्या राबवू शकतो हे ज्ञान त्यातून राहुलला मिळालं. ब्राझील, चिली, पेरू, स्पेन, जॉर्डन, नेदरलॅंड, थायलंड आदी देशांना त्यानं भेट दिली. त्यातून आपल्या शेतीत गरजेनुरूप विज्ञान व तंत्रज्ञान वापरलं. शेतकरीच नव्हेत तर शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, कृषी विभाग, उद्योजक आदी सर्वांनी भेट देऊन अनुभवावी अशीच राहुलची शेती आहे.