अहमदनगर - संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी या आमदारांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली.
हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'
या मुलाखती दरम्यान, गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनीही हजरजबाबीपणे उत्तर देत म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. त्यावर गुप्तेंनी पुन्हा विचारले, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
हेही वाचा - ...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार मानतो की तुम्ही हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला. लोकांमधले प्रश्न विचारण्याचे धाडस वाढते ते महत्वाचे आहे. कुठलाही प्रोटोकॉल मिळाला किंवा काढला तरी राहणे, वागणे बदलू नका, असे आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेले आठवत नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'लंके प्रतिष्ठान'च्यावतीने पारनेरमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन
दरम्यान, कार्यक्रमात ठाकरे म्हणाले की, आजोबा हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विचारांची पेरणी केली. काल कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात, असे म्हटले. महाराष्ट्राचे भविष्य घडवायचो आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.