अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असलेला मास्टर माईंड पत्रकार बाळ बोठे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अहमदनगर पोलिसांनी त्याला हैदराबादमधून जेरबंद केले आहे. रेखा जरे यांच्याकडून आपली बदनामी होऊ शकते भीतीतून त्यांची हत्या घडवून आणल्याची माहिती बोठेने दिली, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. बोठेची अधिक चौकशी केल्यानंतर इतर कारणे स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
वेषांतरकरून राहत होता बाळ बोठे -
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात आरोपी म्हणून बोठेचे नाव स्पष्ट होताच तो फरार झाला होता. गेले साडेतीन महिने तो विविध ठिकाणी वेषांतर करून राहत होता. सर्वात जास्त काळ तो हैद्राबाद येथील बिलालनगरमध्ये लपून होता. चार दिवसांपूर्वी त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने चार ते पाच ठिकाणी स्थलांतर केले. मात्र, शेवटी हैद्राबादमधील बालाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये त्याला आज (शनिवारी) सकाळी अटक करण्यात आली. बोठेला मदत करणाऱ्या एक वकीलासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हत्येनंतर साडेतीन महिने बोठे होता फरार -
30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची पुण्याहून नगरला येताना जातेगाव घाटामध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. या प्रकरणात बाळ बोठेचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो फरार होता. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावरती होती. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
बाळ बोठेला लपून राहण्याससाठी मदत करणाऱ्यांची होणार चौकशी -
जवळपास साडेतीन महिने बाळ बोठे कुठे फरार होता. यादरम्यान त्याला लपवून ठेवण्यात आणि त्याला मदत करण्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, याबाबत आता उत्सुकता आहे. कारण बाळ बोठेचे अनेक राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रातील मोठ्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे बाळ बोठेला लपवून ठेवण्यात कोणी मदत केली याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
बोठेच्या चौकशीनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार -
पोलिसांनी बाळ बोठे आणि अटक केलेल्या पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. आता बाळ बोठेच्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्या आधारे पोलीस पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करतील. या प्रकरणात पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बाळ बोठेने हैदराबादमध्ये शरण येण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येत आहे. यासाठी पोलिसांच्या समोर हजर राहण्याकरता तयार होता, असेही पोलीस सूत्रांकडून समजते. मात्र, पोलिसांना शरण न येता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.