अहमदनगर - अकोले तालुक्यातील अती दुर्गम भागातील फोपसंडी येथे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत भौतिक सुविधा नाहीत. या परिसरात मोबाईल टॉवर नसून कोणतेही नेटवर्क नाही. मग आपण आपले शिक्षण कसे पूर्ण करायचे, आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण कसे करायचे, असे प्रश्न घेवून फोपसंडीच्या 13 वर्षाच्या तुषार मुठेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
अकोले तालुक्यातील अती दुर्गम, जिथे सूर्याचेही दर्शन सकाळी 10 नंतर दर्शन देतो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. गावात प्राथमिक शिक्षण सोडले तर काहीच सुविधा नाही. जिथे स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी एस.टी. पोहोचली, अशा आदिवासी बहुल फोपसंडी गावातील तुषार दत्तात्रय मुठे हा आदिवासी विकास विभागामार्फत नामांकित इंग्रजी शाळा प्रवेश योजनेअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे इंग्रजी माध्यम शाळा (वीरगाव, ता. अकोले) या शाळेत ईयत्ता सातवीत शिकत आहे. तुषार हा अतिशय हुशार व चुणचुणीत विद्यार्थी असून भविष्यात स्पर्धा परीक्षा देवून जिल्हाधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणे आपल्या हातात
मार्च, 2020 पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. सर्व विद्यार्थी घरीच असून ज्यांना पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या ते शिक्षण घेत आहेत. मात्र, अती दुर्गम, आदिवासी भागात वीज व मोबाईल नेटवर्कचा गंभीर प्रश्न आहे. गेले वर्षभर अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडले आहेत. तुषारही शैक्षणिक प्रवाहाबाहेर पडला आहे. फोपसंडी गावचे प्रश्न गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनास सांगूनही सुटत नसल्याने त्याने मोबाईल टॉवर, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या व गावच्या व्यथा मांडल्या आहेत. आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणे आपल्या हातात असल्याचेही तूषारने शेवटी लिहिले आहे.
तूषारने 3 जूनला हे पत्र टपालाने व ई-मेलद्वारे पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे. आता पंतप्रधान महोदय या संवेदनशील पत्राचा खरेच सहानुभूतीपूर्वक विचार करतील व आपल्या गावात ऑनलाइन शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होईल, या आशेवर तुषार आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे.
हेही वाचा - आवास योजनेतून 60 कुटुंबांना मिळाले हक्काचे घर