अहमदनगर - निसर्ग चक्रीवादळात खाली पडलेल्या विद्युत वाहक तारेच्या धक्क्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे घडली. आर्यन गणेश गायकर असे त्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आर्यन हा पाणी भरण्यासाठी वडिलांच्या मागे शेतात गेला होता.
शेतात पडलेली विद्युत वाहक तार आर्यनच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा पाय विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारेवर पडला. आर्यनला वाचवण्यासाठी मोठ्याने आरडाओरडा करुन देखील विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला तो चिटकला. आरडाओरडा झाल्याने आर्यनचे वडील गणेश गायकर यांनी पळत येऊन लाकडाने त्याला बाजुला केले. यादरम्यान आठ वर्षाचा आर्यन हा बेशुद्ध झाला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या आर्यनला संगमनेर येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान आर्यनला मृत घोषित करण्यात आले आहे. तर मामा प्रवीण कानवडे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या महावितरण'च्या विद्युत वाहक तारा शेतात तशाच पडलेल्या होत्या. त्यामध्ये विद्युत प्रवाह गेली पंधरा दिवसापासून तसाच सुरू होता. अनेक वेळा कानवडे यांनी महावितरणला माहिती दिली होती. परंतु दोन आठवडे उलटून गेले, तरीही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला असून विद्युततार जमीनीवर पडलेली आहे. तरी देखील प्रवाह चालू होता. ही तार दुरुस्त न करता तीन आठवडे उलटून गेले, तरीही तशाच परिस्थित प्रवाह सुरू होता. आता ग्रामस्थांनी संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी आर्यनवर काळाची झडप
आर्यनचा तीन दिवसापूर्वीच वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस त्याच्या घरच्यांनी साजराही केला होता. त्याच्या वाढदिवसाचा आनंद संपतो न संपतो तोच त्याच्यावर काळाने झडप घातली. मामाला पाणी देण्यासाठी गेलेल्या आर्यनला विजेचा धक्का लागून तो ठार झाला. यावेळी त्याला वाचवण्यास गेलेले त्याचे मामा प्रविण हा देखील गंभीर झाला होता. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र आर्यनचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.