अहमदनगर - ३१ डिसेंबरला ७१ दिव्यांगांनी कळसुबाई शिखर सर केले. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर असून ते चढने सामान्यांनाही आव्हानात्मक आहे. मात्र, या दिव्यांगांनी अडचणींवर मात करून या शिखरावर चढाई केली आहे. विशेष म्हणजे, राहता तालुक्यातील दिव्यांग चैतन्य कुलकर्णी यांनी दोन्ही पाय निकामी असताना या शिखरावर चढाई केली.
हेही वाचा - 'काँग्रेस कधीही नामांतराच्या बाजूने उभी रहात नाही'
यांच्या मार्गदर्शनात सर केला शिखर
अकोले तालुक्यातील राजूर येथील दिव्यांग केशव भांगरे, औरंगाबाद दिव्यांग संस्थेचे शिवाजीराव गाडे यांच्या मार्गदर्शनात या दिव्यांगांनी ही मोहीम फतह केली. या मोहिमेत १५ जिल्ह्यातील एकून ७० दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. सर्वजण ३१ डिसेंबरला पहाटे पाच वाजता गडावर जाण्यासाठी निघाले व रात्री ७ ला त्यांनी शिखर माथा गाठला. येथे तंबू ठोकून त्यांनी मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी (१ जानेवारी २०२१) सकाळी सात वाजता कळसुबाई मातेचे दर्शन घेतले व नवीन वर्षाचे स्वागत केले.
७५ टक्के अंपगत्व होते, तरीही चैतन्य यांनी गाठले शिखर
शिवुर्जा प्रतिष्ठाणचे संस्थापक शिवाजी गाडे यांनी पुष्पगुच्छ, हार, प्रमाणपत्र व पदक देऊन दिव्यांगांचे कौतुक केले. यात दिव्यांग ट्रेकर केशव भांगरे यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर कळसुबाई हे 11 वेळा सर करून विक्रम केला आहे. राहता तालुक्यातील दहाड बुद्रुक येथील दिव्यांग चैतन्य विश्वास कुलकर्णी यांनी दोन्ही पाय निकामी असताना हा शिखर सर केला आहे. पाच वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्यांचा शरीराचा शून्य टक्के तोल आहे. तसेच, ते आपल्या हाताच्या साहायाने स्टिक घेऊन आपल्या शरीराचा तोल सांभाळतात. त्यांना 75 टक्के अपंगत्व आहे. मात्र, या सर्व बाबींवर मात करत त्यांनी कळसुबाई शिखर सर केला.
मोहिमेत १२ महिलांचा सहभाग
या मोहिमेत १२ महिलांचा सहभाग होता. दिव्यांगांना कळसुबाई पायथ्यावरील जहांगीर वाडी या गावातील मच्छू खाडे यांची साथ लाभली. बारी गावातील राहुल खाडे हे चैतन्य यांचे मदतनीस म्हणून काम करत होते. चैतन्य यांना शिखर सर करण्यासाठी त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच, नागपूर येथील दिव्यांग गिर्यारोहक सुनील वानखेडे व पलस हे ही चैतन्य यांना शिखर चढाईसाठी मदत करत होते.
हेही वाचा - 'बोली'वाल्या सरपंचांना अण्णा हजारेंच्या कानपिचक्या