अहमदनगर - जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सरासरी 65 टक्के मतदान झाले. सुमारे 22 लाख 50 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान नेवासे तालुक्यात 78.00 टक्के झाले. सर्वात कमी मतदान हे नगर शहर मतदारसंघात 54.50 टक्के एवढे झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मतदान शांततेत झाले. जामखेडमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी होऊन एकावर चाकू हल्ला झाला. पाथर्डी, नेवासे, नगर शहर मतदारसंघात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्रकार घडले.
हेही वाचा - एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?
विशेष म्हणजे, पावसात देखील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाचवेळी मतदान झाले. नगर जिल्ह्यात बारा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात 116 उमेदवार होते. तसेच 34 लाख 73 हजार 743 मतदार होते. या एकूण मतदारांपैकी सुमारे 22 लाख 50 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात सुमारे 12 लाख 10 हजार पुरूष, सुमारे 10 लाख 48 हजार महिला आणि 58 तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे.
हेही वाचा - मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क
अकोले मतदारसंघात 67.73, संगमनेर 69.30, शिर्डी 64.25, कोपरगाव 69.40, श्रीरामपूर 62.14, नेवासे 72.64, शेवगाव 62.99, राहुरी 63.18, पारनेर 64.20, नगर शहर 52.69, श्रीगोंदे 63.38 व कर्जत-जामखेड 71.34 टक्के मतदान झाले.
मतमोजणी गुरूवारी 24 ऑक्टोबरला होणार आहे. या मतमोजणीकडे उमेदवारांसह नगर जिल्ह्यातील मतदारांचे, राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्यात आला होता. शेवगाव तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडी आणि कोपरगावातील चांदेकसारे, सोनेवाडीमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता.