अहमदनगर - इराणी आणि जपानी जवळपास २२ नागरिक सध्याच्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अहमदनगर शहराजवळ अरणगाव येथे अडकून पडले आहेत. नगर शहराजवळ मेहरबाबा आश्रमात ही विदेशी मंडळी गेल्या महिन्यात मेहरबाबांच्या वार्षिक अमरतिथी सोहळ्यासाठी आली होती. व्हिसा असल्याने हे विदेशी पाहुणे जरा जास्त काळ थांबले खरे, पण दरम्यान कोरोनाचे संकट जगभर पोहचले, त्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून सरकारने अनेक देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आणि त्यामुळे या २२ इराणी आणि जपानी नागरिकांना सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या मायदेशी परतणे अवघड झाले आहे.
एकीकडे व्हिसाची मुदत संपली असताना त्यांच्या जवळ असलेले पैसेही संपले आहेत. अशात मेहरबाबा ट्रस्ट आणि अरणगाव येथील काही नागरिकांनी माणुसकीच्या भावनेतून या विदेशी नागरिकांची परिसरातच एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. स्थानिकांनी त्यांना किराण माल भरून दिला असून हे सर्वजण स्वतःचा स्वयंपाक बनवून खात आहेत. या बिकट परस्थितीत जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना मदत करावी, अशी मागणी स्थानिक मेहरबाबांच्या भक्तांनी केली आहे.
व्हिसाची मुदत संपल्याने मेहरबाबा ट्रस्ट त्यांना मदत करू शकत नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाला ट्रस्टने कळवले आहे. स्वतःजवळचे पैसे संपलेले असताना आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सध्या बंद असताना जिल्हा प्रशासनाने या विदेशी पाहुण्यांची कायदेशीर सोय लावणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिक नागरिक खूप चांगले असून मदत करत असल्याची भावना या इराणी-जपानी नागरिकांनी बोलून दाखवत भारतीय सहिष्णुतेचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - कोरोना : मुंबई मेट्रो, घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी घटली