अहमदनगर - जिल्ह्यातील जामखेड शहरात विंचरणा नदीकाठी शंकरांची २१ फुट मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. नदीकाठावर भगवान शंकराची भव्य दिव्य अशी मुर्ती विधीवत बसवण्यात आली. प्रतिष्ठापना व महापुजेसाठी आमदार रोहित पवार यांच्या समवेत पंचवीस सपत्नीक जोड्या बसवल्या होत्या. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी या मूर्तीची निर्मिती केली आहे.
नदी ही सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान असते. हे ठिकाण शहराजवळ असेल तर ते स्वच्छ व सुंदर असावे असे सर्वांना वाटते. या विचारातूनच नदीचे सुशोभीकरण करून तीरावर भगवान शंकराची मूर्ती बसवण्यात आली आहे. लवकरात लवकर नदीकाठावरील मंदीराचे सुशोभीकरण करण्यात येईल. सुरुवातीला नदी म्हणजे फक्त पात्रच होते. एक मोठी गटार तयार झाली होती. आता नदीच्या दोन्ही बाजूला रोड असावेत, लहान मुलांना तेथे सायकल खेळता यावी, लोकांना सकाळी फिरता यावे यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी दिला आहे. तो लवकरच मंजूर होईल. शहराच्या नियोजनासाठी सर्वजण झटत आहेत. मूर्ती बसवताना सर्वांचे सहकार्य लाभले आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांची कलाकृती -
१९७६ साली मी नगरपासून जामखेडपर्यंत मैलाचे दगड बसवण्याचे काम केले होते. आज ४५ वर्षांनी त्याच ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती बसवण्यात आली. त्यामूर्तीचे काम माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली.
पांडुरंग शास्त्री देशमुख देवा यांच्यासह अनेक वैदिक ब्रह्मांवृंदाच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार यांचे आईवडील राजेंद्र व सुनंदा पवार यांच्यासह, प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, राजेंद्र कोठारी, चंद्रकांत राळेभात, राजू गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.