अहमदनगर - एकीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनाशी यशस्वी लढा देऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या दृष्टीने आजचा बुधवार नगर जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक ठरला असून एकाच दिवशी तब्बल २० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. विशेष म्हणजे यात एका ८५ वर्षीय आजीबाई आहेत.
जिल्ह्यातील २० रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतले. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले ०७, नगर महापालिका क्षेत्रातील ०७, संगमनेर ०४, राहाता ०१ आणि श्रीगोंदा येथील ०१ अशा २० व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६१ झाली आहे.
८५ वर्षांच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त..
मुंबईहून श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव येथे आलेल्या 85 वर्षीय आजीला कोरोनाने घेरले. सोबतीला इतर आजारही होतेच. मात्र, मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीबाई आज कोरोनातून बर्या होऊन घरी परतल्या आहेत. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना वैद्यकीय तपासणी नंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना निरोप दिला आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
या आजीबाई मुंबई येथून 1 जून रोजी गावी आल्या होत्या. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह आणि इतर आजारांचाही त्रास होत असल्याने सुरुवातीचे तीन-चार दिवस त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला आणि ठणठणीत बरे होऊन तिथून त्या बाहेर पडल्या. कोरोनातून बरे होऊन त्यांनी या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्ये ही निर्माण केला आहे. लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत, हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. त्यामुळे रुग्ण त्यातून बरा होऊ शकतो हाच संदेश आजीबाईंनी इतरांनाही दिला आहे.
आज आढळला एक नवा रुग्ण..
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत आज ०५ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी पाठवम्यात आले होते. यात एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खासगी कंपनीतील व्यवस्थापक कोरोना बाधित दिसून आला. ही व्यक्ती दिल्लीहून प्रवास करून आली होती. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली होती. आज तो बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.