अहमदनगर - ज्वारी, बाजरीची भाकरी ही आपल्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रमुख पौष्टिक अन्न. पण, आज गरिबांची ओळख असलेल्या ज्वारी-बाजरीला कमी भाव, कमी उत्पन्न म्हणून शेतकरी त्यांच्या लागवडीपासून दुरावलाय. मात्र, याच कडधान्यावर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका उद्योजकाने शेतीला जोडधंदा म्हणून कडधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तयार केलेल्या या पौष्टीक पदार्थांना आता चांगले भाव मिळू लागले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा येथील शेतकरी कुटुंबातील आणि कृषी पदवीधर असलेल्या तात्यासाहेब फडतरे आणि पत्नी सरोजनी यांनी 'समृध्दी अॅग्रो' या संस्थेमार्फत ज्वारी-बाजरी आणि नाचणीपासून 'रेडी टू इट' असे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे. भाकरी व्यतिरिक्त ज्वारीचा रवा, पोहे, इडली, चकली, मिक्स चिवडा असे पदार्थ ते तयार करताहेत. ज्वारी व बाजरीपासून पोहे, रवा, इडली, मल्टीग्रेन फ्लोअर आणि नाचणीपासून बनविलेली इडली, डोसा पीठ व रवा अशा १६ पदार्थांची निर्मिती केली आहे. हे पदार्थ ग्लूटेन फ्री असून त्यांना चांगली मागणी आहे.
कडधान्य म्हटलं तर उसळीशिवाय अजून काय, असा प्रश्न पडतो आणि तृणधान्यापासून पोळी, भाकरीशिवाय आपण काही करत नाही. परंतु, आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषणमूल्ये कडधान्यातून जास्त प्रमाणात मिळतात. याचे महत्त्व ओळखून आता कडधान्य आणि तृणधान्याच्या थोड्या वेगळ्या रेसिपीज आपणास बघावसाय मिळू लागल्या आहेत. वेगवेगळी कडधान्ये, तृणधान्ये, त्याचे महत्त्व, त्यापासून तयार होणारे पदार्थ आता शेतकरीच तयार करू लागले आहेत. यामुळे दुष्काळी भागातील पीक समजल्या जाणाऱ्या ज्वारीलाही आता चांगले दिवस येऊ लागले आहेत.
या उद्योगात लागणाऱ्या प्रक्रियेसाठी सोपान यांनी सोलापूर भागातील शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरीची खरेदी आणि अकोले, नाशिक येथील शेतकऱ्यांकडून नाचणीची खरेदी केली. शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा ४ ते ५ रुपये जास्त दर दिला जातो, शिवाय वाहतुकीचा खर्चही समृध्दी अॅग्रोच करते. या उद्योगामुळे शेती व्यतिरिक्त फडतरे कुटुंबीयांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ८ मजूर कार्यरत असून पदार्थांच्या वितरणासाठी स्वतंत्र टीम असल्याने इतरांनाही रोजगार प्राप्त झालाय. आता दुष्काळी ज्वारीच्या 'गुड टू ईट' पदार्थाची सातासमुद्रापार ख्याती पसरली आहे. तसेच, प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल ३० ते ३५ लाखांपर्यंत पोचली आहे. आत्तापर्यंत अनेकांना ज्वारीचा हुरडाच माहीत होता. मात्र, आता या ज्वारीपासून अनेक उपपदार्थ तयार होत आहेत. उच्चभ्रू तसेच राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ वापरले जात असल्याने शेतकऱ्यांच्या ज्वारीला चांगला भाव आणि तरुण उदयोजकांना एक नवीन उद्योगाची वाट मोकळी झाली आहे.
हेही वाचा - तब्बल 20 तासानंतर सापडला पाण्यात वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह
तात्यासाहेब फडतरे यांनी ज्वारी बाजरीपासून चिवडा, रवा, इडली पीठ, पोहे असे पर्याय निर्माण केले. या पदार्थांचा त्यांनी मॉल सुरू केला, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी या मॉलचे उद्घाटन केले. सरकारनेही अशा उपक्रमाच्या पाठीशी उभे राहण्याची अपेक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केली. फास्टफुडच्या जमान्यात केवळ जाहिरातीला भूलून आरोग्यवर्धक खाणं आपण विसरून गेलोय. पण, सुदृढ आणि सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी ज्वारी बाजरीच्या पदार्थांना सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विदेशी फास्ट फूडला टक्कर देण्यासाठी देशी ज्वारीचा हा मॉल अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, शिवाय ज्वारीलाही अच्छे दिन आणू शकतो.
हेही वाचा - मोहिनीराज यात्रा महोत्सवाला सुरूवात, दिव्यांनी उजळले मंदिर