अहमदनगर - आदिवासी कुटुंबात जन्मलेला आणि निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणारा अवघा 12 वर्षांचा विशाल याच्या बोटांमधील जादू पाहिल्यावर आपल्या डोळ्यांची पारणे फिटतात. राहुरी तालुक्यातील वळण येथील गाडगे महाराज आश्रम शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे.
प्राणी, पक्षी, फुले अशा विविध प्रकारचे चित्र विशाल अगदी सहज रेखाटतो. खडूवर, त्याची ही कला पाहून शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी पाहून दंग राहून गेलेत. विशाल संजय मोरे असे या बाल चित्र व शिल्पकाराचे नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज तालुक्यातील वडगाव या गावातील आहे. त्याचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरी करतात आणि विशाल चांगला शिकवा म्हणून आई वडिलांनी विशालला मागील वर्षी राहुरी तालुक्यातील वळण येथील गाडगे महाराज आश्रम शाळेत पाठवले आहे.
विशाल शाळेत आल्यावर वर्गात रिकाम्यावेळी खडूवर विविध प्रकारचे चित्र काढत असल्याचे शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर शिक्षकाने विशालची ही कला शाळेतील मुख्यध्यापकांसमोर मांडली. त्यावेळी सगळ्यांची विशालच्या कलेची वाहवा केली. मात्र, विशालची घरची परिस्थिती नाजूक असल्याने विशालने घरी परत जाण्याचा निर्णय घेतल्याने शाळेतील शिक्षकांनी विशाला घरी न जाऊन देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरच्यांना सांगितले, की अतिशय हुशार आहे, तुमचा मुलगा आणि एक दिवस त्याची कला जगासमोर आणणार. त्यानंतर विशालच्या घरच्यांनी ही विशालला शिकवण्याचा निर्णय घेतला.
शाळेत चित्रकला विषयाचे स्वतंत्र शिक्षक नाही तसेच कुठलेही प्रशिक्षण, मार्गदर्शन नाही. त्यामुळे त्याच्यात दडलेल्या कलेची कुणालाही माहिती नव्हती त्यात विशालची घरची परस्थिती नाजूक असल्याने त्याच्याकडे स्वतःची रंगपेटी नाही. मित्रांचे रंग साहित्य व स्केच पेन घेऊन, चित्र व खडू शिल्पकृत्ती तो साकरतोय. टोकदार कर्कटकच्या साह्याने खडूवर कोरीव काम करून, छत्रपती शिवाजी महाराज, पोपट, वाघ, मोर असे विविध प्राणी, फुलांच्या आकृती विशाल सहज तयार करतोय. त्याच्या चित्रकलेच्या वहीत पेन्सिलने काढलेली सुंदर निसर्ग चित्रे पाहून, त्याच्यातील कलाविष्काराला सर्वजण दाद देत आहेत.