अहमदनगर - शिर्डीतील श्री साई संस्थानला रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या देणग्या प्राप्त होतात. यावर्षी मात्र साई मंदिर भक्तांसाठी बंद आहे. असे असतानाही सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने 100 पीपीई कीट साई संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहेत.
हेही वाचा... कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शिर्डीचे साई संस्थान धावले.. ५१ कोटींची मदत जाहीर
शिर्डी येथील शिलधी प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरात विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिलधी प्रतिष्ठानने यावर्षी गुडीपाडवा महोत्सव रद्द केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे शिर्डी शहरात साई संस्थान, शिर्डी पोलीस, नगर पंचायत यांच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, या उदात्त हेतूने शिलधीच्या साईबाबा संस्थानच्या विविध विभागात काम करत असलेल्या सदस्यांनी एकत्र येत आपला एक दिवसाचा पगार आणि ऐच्छिक रक्कम गोळा केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीपीई कीटची अत्यंत आवश्यकता आणि मागणी आहे. मात्र, त्याचा तुटवडा आहे. अशा वेळी शिलधी प्रतिष्ठानने मोठ्या प्रयत्नाने १ लाखाहून अधिक किमतीच्या १०० कीट उपलब्ध करून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या आहेत. त्याबरोबरच पोलीस स्टेशन, नगरपंचायत कर्मचारी, पत्रकार बंधूंनाही मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत.