टोकियो - भारताची अव्वल महिला बॅडमिंटपटू पी. व्ही. सिंधू सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या यामागुची हिचा पराभव केला. तिने यामागुचीवर 21-13, 22-20 असा रोमहर्षक विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
पहिल्या सेटमध्ये सिंधूचा बोलबाला
पहिल्या सेटमध्ये पी. व्ही. सिंधूने जोरदार खेळ केला. ती पहिल्या सेटमध्ये 8-6 ने आघाडीवर होती. ही बढत तिने 11-8 ने वाढवली. सिंधूचा या सेटमध्ये अखेरपर्यंत बोलबाला राहिला. तिने हा सेट 23 मिनिटात 21-13 असा जिंकला.
यामागुचीची कडवी झुंज सिंधूने मोडली
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने 11-6 अशी बढत घेतली. तिची आघाडी कायम होती. परंतु यामागुचीने देखील जोरदार खेळ करत सिंधूला कडवी झुंज दिली. तिने सामना 16-16 अशा बरोबरीत आणला. त्यानंतर दोघांनी जोरदार खेळ केला तेव्हा सामना 20-20 ने बरोबरीत होता. तेव्हा सिंधूने सलग दोन पाँईंट घेत सेटसह सामना जिंकला.
सिंधू महिला एकेरीत पदकाची प्रबळ दावेदार आहे. तिने उपांत्य फेरी गाठत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
दरम्यान, वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं आहे. तर बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेन हिने उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : दीपिका कुमारीचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले
हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के