टोकियो - भारतीय दिग्गज महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला 48-51 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरिया हिच्याशी झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मेरी कोमचा 2-3 ने पराभव झाला.
मेरी कोम पहिल्या फेरीत 1-4 ने पराभूत झाली. तिने दुसरी फेरी 3-2 ने जिंकत सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत कडवी टक्कर झाली. मेरीने तिसऱ्या फेरीत ३-२ अशी बाजी मारली, परंतु सर्वाधिक गुणांच्या शर्यतीत कोलंबियाची खेळाडू वरचढ ठरली आणि तिला ३-२ असे विजयी घोषित करण्यात आले.
दरम्यान, मेरी कोम आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. परंतु तिने इंग्रीटविरुद्धच्या सामन्यात डिफेन्सिव्ह खेळावर भर दिला. याचा परिणाम तिच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले.
मेरी कोमने सहावेळा जागतिक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. ती पदकाची दावेदार मानली जात होती. पण तिचा पराभव झाला आणि करोडो देशवासियांच्या पदकांच्या आशा संपुष्टात आल्या.
दरम्यान, भारताचा पुरुष बॉक्सर सतीश कुमारने ९१ किलो वजनी गटात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याच्यावर ४-१ असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक पदक निश्चित करण्यासाठी सतीशला फक्त एक विजय आवश्यक आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : इस्त्राइलच्या ज्यूडो खेळाडूविरोधात खेळण्यास 2 खेळाडूंनी का दिला नकार
हेही वाचा - Tokyo Olympics : चीनने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवलं; विश्वविक्रम नोंदवत जिंकलं सुवर्णपदक