न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसमुळे यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेची बक्षीसाची रक्कम कमी करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ८.५० लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी ३६ लाख रुपये) कमी करण्यात आली आहे, असे यूएस टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) सांगितले.
यंदा पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्याला तीन मिलियन डॉलर्स (२२ कोटी ५४ लाख रुपये) बक्षीस म्हणून देण्यात येईल. यूएसटीएच्या म्हणण्यानुसार, यावर्षी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना एकूण ५३.४ मिलियन डॉलर्स (सुमारे ३९९ कोटी रुपये) देण्यात येणार आहेत. मागील वर्षी ही रक्कम ५७.२ मिलियन डॉलर्स (सुमारे ४२७ कोटी रुपये) इतकी होती.
स्पर्धेच्या एकेरी प्रकारातील पहिल्या फेरीत सहभागी झालेल्या खेळाडूंना मिळणारी बक्षिसाची रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी खेळाडूंना ५८,००० डॉलर्स (सुमारे ४३ लाख रुपये) मिळाले होते, तर यावर्षी त्यांना ६१,००० डॉलर्स (सुमारे ४५ लाख रुपये) मिळणार आहेत.
दुसरी व तिसरी फेरी गाठणार्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत बदल झालेला नाही.