नवी दिल्ली - भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू सुमित नागलने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले. नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी जागतिक क्रमवारीत सुमितने सहा स्थानांची झेप घेत १२९ वे स्थान मिळवले आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या एटीपी चॅलेंजर कॅम्पिनास स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सुमितचा पराभव झाला होता.
हेही वाचा - विजय हजारे स्पर्धेत गोलंदाजाचा कारनामा, संघाच्या ७ फंलदाजांना धाडले माघारी
ब्राझीलमध्ये झालेल्या या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या जुआन पाब्लो फिकोविचने सुमितचा ६-४, ६-१ ने पराभव केला होता. जाहीर झालेल्या एटीपी जागतिक क्रमवारीतील पहिल्या १० स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जपान ओपनचा किताब पटकावणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच प्रथम स्थानी विराजमान आहे. स्पेनचा राफेल नदाल दुसऱ्या तर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर तिसऱ्या स्थानावर आहे.
कॅम्पिनास चॅलेंजर स्पर्धेअगोदर पार पडलेल्या ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या जेतेपदावर २२ वर्षाच्या सुमितने आपले नाव कोरले होते. दक्षिण अमेरिकेन क्लेवर, असा पराक्रम करणारा सुमित हा पहिलाच टेनिसपटू ठरला. या स्पर्धेत सातव्या सीडेड सुमितने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या फाकुंडो बॅग्निसला ६-४, ६-२ असे हरवले. या विजेतेपदामुळे जागतिक क्रमवारीतही सुमितला फायदा झाला होता. १५९ व्या स्थानावरून सुमितने १३५ व्या स्थानी उडी घेतली होती. आता सुमितने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले आहे.