लेक्सिंग्टन - अमेरिकेची अनुभवी महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स लेक्सिंग्टन येथे होणाऱ्या टॉप सीड ओपनमधून डब्ल्यूटीए टेनिसमध्ये परतणार आहे. यूएस ओपनची विजेती सेरेना विल्यम्स आणि स्लोन स्टीफन्स 10 ऑगस्टपासून लेक्सिंग्टन येथे सुरू होणाऱ्या स्पर्धेमध्ये खेळतील, असे स्पर्धेच्या आयोजकांनी गुरुवारी सांगितले.
विल्यम्सने फेब्रुवारी महिन्यात फेड कपमध्ये लातवियाविरुद्ध कोर्टात पाऊल ठेवले होते. यापूर्वी तिने 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनमध्ये खेळण्याची माहिती दिली होती.
पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेना 40 वर्षांची होईल. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्यासाठी खेळणे आव्हानात्मक असेल. 2018मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान सेरेनाने तिची बहीण व्हिनस विल्यम्सचे आव्हान मोडून काढत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. महत्त्वाचे म्हणजे, सेरेना तेव्हा गरोदर होती.
1998मध्ये प्रथम यूएस ओपन खेळणारी सेरेना 1999मध्ये विजेती ठरली. त्यानंतर 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014मध्ये तिने विजेतेपद जिंकले. गतवर्षी विम्बल्डन ओपनच्या अंतिम सामन्यात तिला सिमोना हालेप विरुद्ध पराभव पत्करावा लागला.