प्राग - भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलने प्राग चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही फेरी गाठण्यासाठी त्याने स्थानिक खेळाडू जिरी लेहेचाचा पराभव केला. दोन तास रंगलेल्या या सामन्यात सुमितने लेहेचाला ५-७, ७-६(४) ६-३ने पराभूत केले.
उपांत्यपूर्व फेरीत सुमितचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाशी होणार आहे. या स्पर्धेत इतर भारतीयांमध्ये दिविज शरण आणि एन. श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. दुहेरीच्या सामन्यात दिविज शरण आणि रॉबिन हासे यांनी जोनास फोरजेटेक आणि मायकेल व्रबेन्स्कीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर, एन. श्रीराम बालाजीने बेल्जियमच्या किमर कोपेजन्सलसोबत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
यूएस ओपनमध्ये थेट 'एन्ट्री' -
कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाच्या यूएस ओपनमधून अनेक टेनिसपटू माघार घेत आहेत. याचा फायदा सुमित नागलला झाला आहे. सुमितला यूएस ओपनच्या पुरुष एकेरी प्रकारात थेट प्रवेश मिळाला आहे. एटीपीच्या अव्वल १२८ क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश मिळाला असून नागलची जागतिक क्रमवारी १२७ अशी आहे. २२ वर्षीय सुमित नागल हा या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणारा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.