न्यूयॉर्क - टेनिस जगतातील अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला यूएस ओपन स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. राग व्यक्त करताना एका महिला अधिकाऱ्याला चेंडू मारल्याप्रकरणी त्याच्यावर स्पर्धेतून बाद ठरवण्याची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी सर्बियाचा जोकोविच आणि स्पेनचा पाब्लो करेनो बुस्टा यांच्यात उपांत्य पूर्व फेरीतील सामना रंगला होता. या सामन्यात जोकोविच 5-6 असे पिछाडीवर होता. दरम्यान, त्याने रागाच्या भरात मारलेला फटका एका महिला अधिकाऱ्याला लागला. जोरदार फटक्यानंतर महिला अधिकारी खाली कोसळली. यामुळे जोकोविचला अपात्र ठरवण्यात आले.
जोकोविच आणि पाब्लो करेनो बुस्टा यांच्यात उपांत्य पूर्व फेरीतील सामना रंगला होता. या सामन्यात जोकोविच पहिल्या सेटमध्ये 5-6 अशा पिछाडीवर होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात त्याने कोर्टच्या बाहेर चेंडू मारला. जो एका कोर्टवर उभ्या असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लागला आणि ती खाली कोसळली. महिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात आल्यावर जोकोविच तातडीने तिच्याकडे गेला आणि दिलगिरी व्यक्त करत माफीही मागितली. या घटनेनंतर श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे महिला अधिकारी तिथून निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेनंतर रेफ्रींनी १० मिनटांच्या चर्चेनंतर जोकोविचच्या प्रतिस्पर्धी असलेल्या बुस्टाला विजेता घोषित केले. रेफ्रीच्या या घोषणेनंतर जोकोविचने बुस्टाला शुभेच्छा दिल्या आणि हात जोडून माफी मागत कोर्टातून बाहेर पडला. ग्रँडस्लॅम स्पर्धेत अपात्र होणारा जोकोविच जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1990 मध्ये जॉन मॅकेनरोला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर 2000 मध्ये स्टफान कोबेक याला फ्रेंच ओपनमधून अपात्र ठरवण्यात आले होते.
दरम्यान, यूएस ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल कोर्टवर उतरलेले नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत जोकोविच प्रबळ दावेदार होता. त्याने आतापर्यंत 17 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. फेडरर 20 आणि नदालने 19 वेळा जेतेपद मिळवले आहे. ही स्पर्धा या दोन दिग्गजांमधील अंतर कमी करण्यासाठी जोकोविचसाठी महत्त्वाची होती. स्पर्धेतील एका चुकीमुळे यंदाची यूएस ओपन स्पर्धा गाजवण्याची त्याची संधी हुकली.