पॅरिस - फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदालने तृतीय मानांकित स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररवर ६-३, ६-४, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. नदाल २६ वेळा ग्रॅडस्लॅम ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. हे दोन्ही दिग्गज तब्बल आठ वर्षानंतर उपांत्यफेरीत समोरासमोर आले आहेत. गेल्यावेळेस २०११ मध्ये नदालने फेडररला नमविले होते. नदालचा अंतिम सामना सर्बियाच्या नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीम यांच्यातील विजेत्या खेळाडूशी रविवारी होणार आहे.
नदालने आतापर्यंत रेकॉर्ड ११ वेळा फ्रेंच ओपनची स्पर्धा जिंकला आहे. आता त्याची नजर १२ व्या किताबावर आहे. फेडरर दहा वर्षानंतर फ्रेंच ओपन जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. फेडरर २००९ मध्ये स्वीडनच्या रॉबीन सोडरलिंगला नमवून एकमेव फ्रेंच ओपन किताब जिंकला होता. मात्र त्यावेळी नदालने या स्पर्धेतून माघार घेतली होती.
नदाल आणि फेडरर यांच्यात आतापर्यंत ३९ सामने झाले आहेत. यामध्ये २४ वेळा नदाल तर केवळ १५ वेळा फेडरर जिंकला आहे. फ्रेंच ओपनमध्ये नदालने फेडररला सहा वेळा नमविले आहे. नदाल आतापर्यंत एकूण १७ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला आहे. यामध्ये ११ फ्रेंच ओपन, एक ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन, आणि ३ यूएस ओपन स्पर्धा जिंकला आहे. फ्रेंच ओपनमध्ये नदालने एकूण ९४ सामने जिंकले असून, केवळ दोनच सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये ७४ सामने तो ३-० ने जिंकला आहे. यावरूनच त्याचे फ्रेंच ओपनमधील दबदबा दिसून येते.