मेलबर्न - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस कारकिर्दीच्या अखेरच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे. मिश्र दुहेरीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पेस आणि त्याची जोडीदार येलेना ओस्टापेन्को यांना जेमी मरे आणि बेथानी मॅटेक यांनी सरळ सेटमध्ये पराभूत केले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : अमेरिकेच्या २१ वर्षीय टेनिसपटूने गाठली उपांत्य फेरी
जेमी मरे आणि बेथानी मॅटेक यांनी पेस-ओस्टापेन्को जोडीला ६-२, ७-५ असे हरवले. एक तास ७ मिनिटे हा सामना रंगला होता. पेसने लॅटव्हियाच्या येलेना ओस्टापेन्कोसह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयासह सुरुवात केली होती. त्यांनी मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत स्टॉर्म सँडर्स आणि मार्टा पोलमन्स या जोडीला पराभूत केले.
२०१९ मध्ये पेस आणि न्यूझीलंडच्या मार्कस डॅनियल या जोडीने हॉल ऑफ फेम टेनिस ओपनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली होती. ४६ वर्षीय पेस २००६ नंतर एटीपीच्या उपांत्य सामन्यात पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. त्याने अमेरिकेचे दिग्गज खेळाडू जॉन मॅक्नेरो यांना मागे टाकले. १८ ग्रँडस्लम जिंकणारा पेस हा दुहेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्यांमध्ये सहावा खेळाडू ठरला आहे.