न्यूयॉर्क - माजी अव्वल आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्स रविवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टीम टेनिस (डब्ल्यूटीटी) स्पर्धेत खेळणार आहे. तब्बल आठ वर्षानंतर यावर्षी फेब्रुवारीत व्यावसायिक टेनिसमध्ये परतलेली क्लाइस्टर्स मार्डी फिश, जॅक सॉक, सॅबिल लिसिस्की, नील स्कूपस्की आणि क्वेटा पॉश्के यांच्यासोबत एका संघात असेल.
प्रत्येक खेळाडू 12 ते 30 जुलै दरम्यान होणार्या संपूर्ण तीन आठवड्यांच्या हंगामात खेळेल, असे डब्ल्यूटीटीने यापूर्वी सांगितले होते. उपांत्य फेरीचा सामना 1 ऑगस्टला तर अंतिम सामना 2 ऑगस्टला होईल.
आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रथमच टेनिस कोर्टवर धडक मारणार्या महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला दुबई ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने बेल्जियमच्या किमला 6-2, 7-6 असे नमवले.
तीन मुलांची आई असलेल्या किमने याआधी दोनवेळा निवृत्ती स्वीकारली होती. 2003 मध्ये किमने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. तर, 2005 मध्ये तिने आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
2007 मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने 2010 मध्ये यूएस ओपनला गवसणी घातली. त्यानंतर 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती.