मेलबर्न - भारताची युवा महिला टेनिसपटू अंकिता रैनाने डब्ल्यूटीए टूरमधील पहिले विजेतेपद पटकावले आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या आयलँड ट्रॉफी डब्ल्यूटीए २५० टेनिस स्पर्धेत अंकिताने रशियाच्या कमिला राखीमोसोबत हे विजेतेपद जिंकले. या जोडीने रशियाच्या अॅना ब्लिंकोवा आणि अनास्तासिया पोटापोव्हाचा २-६, ६-४, १०-७ असा पराभव केला.
या कामगिरीमुळे २८ वर्षीय अंकिताला डब्ल्यूटीए क्रमवारीत अव्वल १००मध्ये प्रवेश मिळेल. सध्या ती ९४व्या क्रमांकावर आहे. अंकिता आणि कमिला यांनी यापूर्वी दुहेरीच्या उपांत्य फेरीत फ्रान्सेस्का जोन्स आणि नादिया पोडोरोस्का यांच्यावर ४-६, ६-४, ११-९ने विजय मिळविला. अंकिता एकेरी प्रकारातही खेळली होती, तिला पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा - IPL Auction २०२१ : आयपीएलच्या लिलावात 'हे' १० खेळाडू ठरले महागडे
यापूर्वी, अंकिता एका ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी पाचवी भारतीय महिला ठरली होती. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोमनियाच्या मिहेला बुझ्रेनस्कूच्या जोडीने तिने महिला दुहेरीत प्रवेश केला. या जोडीला पहिल्या फेरीच्या सामन्यात बेलिंडा वूलकोक आणि ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हिया गेडेकीकडून ३-६, ०-६ असा पराभव पत्करावा लागला.