पॅरिस - 'लाल मातीचा बादशहा' स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा जागतिक अव्वल नामांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नदालची या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही आजवरची तेरावी वेळ आहे. तर जोकोव्हिचने पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
राफेल नदालने उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनचा तीन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. त्याने हा सामना 6-3, 6-3, 7-6 असा एकतर्फी जिंकला. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान नदालने एकही सेट न गमावता स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे उपांत्य फेरीत जोकोव्हिचची लढत ग्रीसच्या स्टेफानोस त्सिसिपासशी झाली. या सामन्यात जोकोव्हिचने पहिले दोन सेट्स 6-3, 6-2 असे आरामात जिंकले. पण त्सिसिपासने पुढचे दोन्ही सेट्स जिंकून सामना बरोबरीत आणला. तेव्हा जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावून अखेरचा सेट 6-1 असा जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
'लाल मातीचा बादशहा' अशी ओळख असलेल्या नदालने मागील पंधरा वर्षात फ्रेंच ओपनमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. त्याने 2005 पासून 12 वेळा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. विशेष बाब म्हणजे, या बाराही वेळा नदालने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
जोकोव्हिचने क्ले कोर्टवरच्या स्पर्धेत ५ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण त्याला फक्त एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले. त्याने 2016 मध्ये अँडी मरेचा पराभव करत पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून नदाल रॉजर फेडररच्या २० व्या ग्रँडस्लॅमशी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.