मेलबर्न - जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेला रशियाचा पुरूष टेनिसपटू डेनिल मेदवेदेवने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने आपल्याच देशाच्या आंद्रे रुबलेव याचा उपांत्यपूर्व फेरीत तीन सेटमध्ये एकतर्फा पराभव केला.
मेदवेदेवने सातव्या मानांकित रुबलेव याचा ७-५, ६-३, ६-२ अशा फरकाने पराभव केला. मेदवेदेव प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याने २०२० मध्ये अमेरिका ओपन स्पर्धा जिंकली होती. यानंतर त्याने टॉप-१० खेळाडूंविरोधात ११ सामने खेळली आहेत. यात त्याने सर्व सामन्यात विजय मिळवला आहे.
उपांत्य फेरीत मेदवेदेव याचा सामना राफेल नदाल आणि स्टेफानोस सितसिपास यांच्यातील विजेत्याशी होईल. एटीपी फायनल्सचा विजेता मेदवेदेवने मागील १९ सामने सलग जिंकले आहेत.
जेनिफर ब्रॅडी उपांत्य फेरीत...
अमेरिकेची २२ वर्षीय महिला टेनिसपटू जेनिफर ब्रॅडी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ब्रॅडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्याच जेस्सिका पेगुलाचा ४-६, ६-२, ६-१ असा पराभव केला. आता तिला उपांत्य फेरीत कॅरोलिना मुकोवाशी सामना करावा लागणार आहे. मुकोवाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिग्गज अश्ले बार्टीला पराभूत केले आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : २२ वर्षीय ब्रॅडीची उपांत्य फेरीत धडक
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : उपांत्य सामन्यात सेरेना-ओसाका भिडणार