मेलबर्न - भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. बुधवारी मिश्र दुहेरीत सानिया भारताच्याच रोहन बोपण्णाच्या साथीने कोर्टवर उतरणार होती. पण तिने दुखापतीमुळे कोर्टवर न उतरणेच पसंत केले. आज तिचा महिला दुहेरीतील सामना होता. ती आपली युक्रेनची जोडीदार नाडिया किचेनॉकसह मैदानात उतरली खरी, पण तिला दुखापतीमुळे सामना अर्ध्यातून सोडवा लागला.
महिला दुहेरीत सानिया-नाडिया जोडीचा सामना, चीनच्या शिवयुन हॅन-लिन जु या जोडीशी झाला. सामन्यादरम्यान सानियाची दुखापत उफाळून आली. तेव्हा तिने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सामना सोडण्याच्या आधी चीनच्या जोडीने पहिला सेट ६-२ ने जिंकला होता. तर दुसऱ्या सेटमध्येही चीनची जोडी १-० ने आघाडीवर होती.
सानियाला सरावादरम्यान पायाला दुखापत झाली होती. यामुळे ती आजच्या सामन्यात पट्टी बांधून उतरली होती. पहिल्या सेटनंतर तिने मेडिकल टाईम आऊट घेतला. यावेळी तिच्यावर उपचार करण्यात आले. पण तिला जास्त त्रास होत असल्याने तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
सानिया-नाडिया जोडीने मागील आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियात होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या जोडीने चीनच्या जोडीचा ६-४, ६-४ ने धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा - Australian Open : जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत, कोकोची विजयी धमाल सुरूच...
हेही वाचा - आई बनल्यानंतर सानियाची दमदार वापसी, जिंकली होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा