मेलबर्न - वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनला आजपासून सुरुवात होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविचसह स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तर महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी खुणावत आहे. दरम्यान, या स्पर्धेवर नुकत्याच झालेल्या वणव्यांमुळे निर्माण झालेल्या धुराचे सावट आहे.
नोव्हाक जोकोविच या वेळी विक्रमी आठव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. त्याला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांचे कडवे आव्हान असणार आहे. जोकोविची पहिल्या फेरीत लढत जॅन लेनार्ड याच्याशी होणार आहे. तर नदालचा सामना पहिल्या फेरीत बोलिव्हियाच्या ह्युगो डेलिएनशी होईल. फेडररसमोर पहिल्या फेरीत अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचे आव्हान आहे.
महिला एकेरीत सेरेनाचा पहिल्या फेरीतील सामना रशियाच्या अॅनास्ताशिया पोतापोवाविरुद्ध होणार आहे. तर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीची सलामीची लढत युक्रेनच्या लेसिया सुरेंकोशी होणार आहे. सेरेनाला या स्पर्धेत बार्टीसह नाओमी ओसाकाचे कडवे आव्हान असणार आहे.
भारताची मदार यांच्यावर -
ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील पुरूष गटात भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनने मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. सलामीच्या लढतीत त्याच्यासमोर जपानच्या तात्सुमा इतोचे आव्हान आहे. तर महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा तब्बल दोन वर्षांनंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार आहे. सानिया व तिची युक्रेनची जोडीदार नादिया किचेनॉक यांचा सलामीचा सामना चीनच्या हान झीनयुन आणि झू लीन या जोडीशी होईल.
पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा जपानच्या यासुताका उचियामाच्या साथीने खेळणार असून पहिल्या फेरीत ते बॉब व माइक या ब्रायन बंधूंविरुद्ध खेळतील. भारताचा दिविज शरण दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या अर्टेम सिताकसोबत खेळणार आहे.
हेही वाचा - आई बनल्यानंतर सानियाची दमदार वापसी, जिंकली होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा
हेही वाचा - २० वर्षाच्या रायबाकीनाने जिंकले होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद