दुबई - भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैनाने जॉर्जियाच्या इकॅटरिन जॉजरेझेसमवेत खेळताना दुबई येथील अल हबतूर चॅलेंज या ‘आयटीएफ’ प्रकारातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंकिताचे हे चालू वर्षांत पटकावलेले दुहेरीतील तिसरे विजेतेपद ठरले.
हेही वाचा - मोठी बातमी..पहिल्या हिंदकेसरी मल्लाचे निधन
अंकिता आणि जॉजरेझे या जोडीने स्पेनची अॅलिओना झॅडोइनोव आणि स्लोव्हाकियाची काजा जुवान या जोडीचा ६-४, ३-६, १०-६ असा पराभव केला. या हंगामात दुहेरीची अंतिम फेरी गाठण्याची अंकिताची ही चौथी वेळ ठरली. मात्र तिचे हे या हंगामातील सर्वोच्च विजेतेपद हे दुबईमधील ठरले आहे. १ लाख डॉलर्स अशी या स्पर्धेची बक्षीस रक्कम होती.
यावर्षी अंकिताने तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत मजल मारली. अंकिताने याआधी फेब्रुवारीमध्ये थायलंड येथील नोनथाबुरी येथे सलग दोन विजेतेपदे दुहेरी प्रकारात पटकावली होती. त्यानंतर, जोधपूर येथे अंकिताने स्नेहल मानेसोबत आयटीएफ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.