दुबई - टी-२० विश्वचषक ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. मागील काही कालावधीपासून आउट ऑफ फॉर्म असलेल्या डेव्हिड वॉर्नरने आज लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी करून विजयात मोलाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा आणि शेवटी भानुका राजपक्षेच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे लंकेने ऑस्ट्रेलियाला १५५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात वॉर्नर आणि फिंच यांनी ७० धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिसने १७व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. फिरकीपटू अॅडम झम्पाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. फिंचने ५ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. वॉर्नरने १० चौकारांसह ६५ धावा केल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने २८ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात लंकेने ६ बाद १५४ धावा केल्या. कुसाल परेरा आणि पथुम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. पण निसांकाला मोठी खेळी करता आली नाही. असलंकाने ४ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. भानुका राजपक्षेने केलेल्या नाबाद ३३ धावांमुळे लंकेला दीडशेचा आकडा गाठता आला. त्याने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, कमिन्स आणि झम्पा यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.