दुबई - टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानला ५ गड्यांनी मात देत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आहे. शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज असताना पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात ४ षटकार ठोकून सामना जिंकवून दिला.
अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान मोहम्मद नबी आणि गुलबदिन नैब यांनी केलेल्या नाबाद ७१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकात ६ बाद १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी कप्तान बाबर आझमने अर्धशतक ठोकले, तर आसिफ अलीने ७ चेंडूत नाबाद २५ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. पाकिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानविरोधात मोठी धावसंख्या उभा करणे शक्य झाले नाही. सुरूवातीपासून पाकच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवायला सुरूवात केली होती. हजरतुल्ला झझाई या सलामी फलंदाजाला खाते नउ घडताच माघारी जावे लागले. दुसरा सलामीवीर मोहम्मद शहजादही दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाज, असगर अफगाण, करीम जनात, नजीबुल्ला झादरन या फलंदाजांनी निराशा केली. मोहम्मद नबी याने कर्णधाराला साजेशी खेळी करण्याचा प्रयत्न केला. गुलबदिन नैबच्या साथीने मोठी धावसंख्या उभा करण्याचा त्याने प्रयत्न केला. अफगाणीस्तानने पाकिस्तानसमोर 148 धावांचे आव्हान ठेवले आहे. अफगाणीस्तानच्या संघाने 20 षटकात 6 बाद 147 धावा केल्या.
दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रौफ आणि शाहिन शाह आफ्रिदी.
अफगाणिस्तान - हजरतुल्ला झझाई, मोहम्मद शहजाद, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला झादरन, मोहम्मद नबी (कर्णधार), असगर अफगाण, गुलबदिन नैब, करीम जनात, राशिद खान, मुजीब उर रहमान आणि नवीन-उल-हक.
हेही वाचा - T20 Wc Wi V/S Ban: वेस्ट इंडिजचा थरारक विजय, बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात