नैरोबी : भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंह (Shaili Singh) हिने रविवारी (23 ऑगस्ट) अंडर 20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले. तर स्वीडनची सध्याची युरोपियन कनिष्ठ चॅम्पियन माजा अस्काग हिने 6.60 मीटर उडी घेऊन सुवर्णपदक जिंकले. युक्रेनच्या मारिया होरिलोव्हाने 6.50 मीटर उडी घेऊन कांस्यपदक जिंकले.
पदकांची संख्या पाहता या खेळामध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे, जिथे दोन रौप्य आणि एक कांस्य जिंकले. याआधी मात्र, ऑलिम्पिक चॅम्पियन भाला फेकणारा नीरज चोप्रा (2016) आणि धावपटू हिमा दासने (2018) 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदके जिंकले होते.
शैलीने पहिल्या प्रयत्नात 6.34 मीटर लांब उडी मारली. दुसऱ्या प्रयत्नातही तिने तितक्याच अंतराची उडी घेतली. तिसऱ्या प्रयत्नात तिने सुधारणा केली आणि 6.59 मीटर लांब उडी मारली. यासह ती पहिल्या स्थानावर आली होती. परंतु माजा अक्साग हिने 6.60 मीटर लांब उडी मारून आघाडी घेतली. शेवटच्या प्रयत्नात शैली सिंहने 6.36 मीटर लांब उडी मारली आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या चॅम्पियनशिपच्या सध्याच्या मोसमात भारताचे हे तिसरे पदक आहे, तर एकूण सातवे पदक आहे.
भारतीय अॅथलेटिक्स मधील उदयोन्मुख तारा मानल्या जाणाऱ्या शैलीने शुक्रवारी पात्रता फेरीत 6.40 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह अव्वल स्थान पटकावले होते.
झांशीत शैलीचा जन्म, बेंगळुरुत प्रशिक्षण
झांशीमध्ये जन्मलेल्या शैलीच्या आई विनिता सिंह शिंपी म्हणून काम करतात. शैली सध्या बेंगळुरूच्या अंजू बॉबी जॉर्ज अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे, जिथे अंजूचे पती बॉबी जॉर्ज शैलीचे प्रशिक्षक आहेत. शैलीने जूनमध्ये राष्ट्रीय (वरिष्ठ) आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत महिलांची लांब उडी स्पर्धा 6.48 मीटरच्या प्रयत्नात जिंकली होती. सध्याच्या 18 वर्षांखालील जागतिक क्रमवारीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर 20 वर्षांखालील राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे.