मोनाको - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर, अॅथलेटिक्सची जागतिक संस्था 'विश्व अॅथलेटिक्स'ने २०२१मध्ये होणारी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा २०२२मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
'जपानचे आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनी जाहीर केलेल्या ऑलिम्पिकच्या नवीन तारखांचे आम्ही समर्थन करतो. यामुळे आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल, असे विश्व अॅथलेटिक्सने एका निवेदनात म्हटले आहे.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप-२०२१ स्पर्धा ६ ते १५ ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या यूजीन येथे होणार होत्या. पण, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी होणार असल्याने ही स्पर्धा २०२२मध्ये खेळवण्यात येणार आहेत.
यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या नवीन तारखांची घोषणा झाली असून स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक स्पर्धा आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जातील.