मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात मोठ्या प्रमाणात झाला असून या विषाणूमुळे १४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. पण, २४ जुलैपासून सुरू होणारी टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आताच घेणे अतिघाईचे ठरेल, अशी स्पष्ट भूमिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतली आहे. दरम्यान, आयओसीच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानेही यावर आपले मत व्यक्त केलं आहे.
काही तासांपूर्वीच, कोरोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, या प्रस्तावाला संभाव्य खेळाडूंचा संघाने (ग्लोबल अॅथलिट) पाठिंबा दिला आहे. तर कॅनडा ऑलिम्पिक संघटनेने, कोरोनाच्या धोक्यामुळे आमचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे, जाहीर केलं आहे. अशात भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने, जिवंत राहिलो तरच खेळू शकू, असं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी १२५ दिवसांचा अवधी राहिला आहे. यावर बोलताना पुनिया म्हणाला की, 'सध्या कोरोना विषाणूमुळे जगभरात जे काही सुरू आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी, असेच मला वाटते. कारण आताचा काळ साऱ्यांसाठीच कसोटीचा आहे.'
ऑलिम्पिक जर नियोजित वेळेत सुरू झाले आणि सर्व देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला तर ते धोकादायक ठरेल. कारण प्रत्येकाचं आयुष्य मोलाचं आहे. सद्या कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, वाट पाहणे उचित ठरेल. कारण, जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळू शकू, असेही पुनिया म्हणाला. तसेच त्याने आपण सराव थांबवलेला नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - ऑलिम्पिक निर्धारित वेळेत होणार नाही, पण..
हेही वाचा - कोरोनामुळे आमचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, 'या' देशानं केलं जाहीर