मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून महिला कुस्तीमध्ये प्रतिनिधीत्व करणारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विनेशचे भारतीय कुस्ती महासंघाने अनिश्चित काळासाठी निलंबन केलं आहे. फोगाटवर शिस्त भंग केल्याचा आरोप आहे. विनेश शिवाय सोनम मलिकला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.
पीटीआयने कुस्ती महासंघातील सूत्रांच्या आधारे सांगितलं की, विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व सामन्यात नियमांचा भंग केला. तिने या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे अधिकृत स्पॉन्सर 'शिवनरेश'चे नाव लागवण्या ऐवजी 'नाईकी'चे नाव लावलं. याशिवाय ती क्रीडा स्पर्धेच्या गावात थांबली नाही आणि तिने इतर भारतीय खेळाडूंसोबत सराव देखील केला नाही.
हे सर्व प्रकार शिस्त भंगात मोडतात. यामुळे विनेशचे अनिश्चित काळासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे ती कोणत्याही राष्ट्रीय आणि स्थानिक स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. दरम्यान, तिला याविषयी आपलं म्हणणे मांडण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे.
कुस्ती महासंघाच्या अधिकारींनी सांगितलं की, विनेशने देशाचे इतर खेळाडूंसोबत (सोनम, अंशु मलिक आणि सीमा बिस्ला) एका ठिकाणी राहण्यास नकार दिला. तिने यावेळी खूप गोंधळ घातला.
दरम्यान, विनेश यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची प्रबळ दावेदार होती. ती हंगेरीमध्ये ट्रेनिंग घेत टोकियोत पोहोचली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत बेलारुसच्या वनेसा हिने तिचा पराभव केला.
कुस्ती महासंघाने 19 वर्षीय सोनम मलिकला देखील नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागितलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमनला टोकियो जाण्याआधी स्वत: किंवा तिच्या परिवाराच्या सदस्यापैकी एकाने डब्ल्यूएफआयच्या ऑफिसमधून पासपोर्ट घेणे आवश्यक होते. पण तिने हे काम 'साई'च्या आधिकाऱ्यांना करायला लावले.
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार
हेही वाचा - नीरज चोप्रा प्रशिक्षक वाद : नाईक यांनी केलं एएफआय प्रमुख सुमरिवाला यांच्या वक्तव्याचं खंडन