अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने बाजी मारली. तर द्वितीय स्थान पुण्याचे भारती विद्यापीठ आणि तृतीय स्थान मुंबईचे एसएनडीटी महिला विद्यापीठाने पटकावले.
चौथे स्थानावर नागपूरचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा संघ राहिला. दरम्यान, हे चारही संघ फेब्रुवारी महिन्यात बनारस येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुल येथे ५ डिसेंबर पासून पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या पाच राज्यातील विद्यापीठांचे महिला संघ सहभागी झाले होते. ६१ संघांपैकी अंतिम ४ संघात मुंबई विद्यापीठ मुंबई, भारती विद्यापीठ पुणे, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर या विद्यापीठाने मजल गाठली होती.
दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्राध्यापक वसंत घुईखेडकर, प्राध्यापक प्रदिप खेडकर, प्रफुल गवई हेही उपस्थित होते.
हेही वाचा - तहसील कार्यालयात बैलजोडी आणत शेतकरी पाणंद रस्ता कृती समितीचे आंदोलन
हेही वाचा - अमरावतीमधील आलमी दिनी इज्तिमात ४५० जोडपी विवाहबध्द