पालघर - वसई विरार महापौर मॅरेथॉनच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोडने अव्वल स्थान पटकावले. त्याने पूर्ण मॅरेथॉनचे ४२ किलोमीटरचे अंतर २ तास २४ मिनिटात पूर्ण केले. दुसरीकडे एलिट अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अनिश थापा तर, महिला गटात किरण सहदेवने बाजी मारली.
स्पर्धकांचा मोठा सहभाग व वसईच्या निसर्गरम्य वातावरणात नववी इंडिया बूल वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा वसईत मोठ्या उत्साहात पार पडली. स्त्री भ्रृण हत्या टाळा, स्वच्छतेबाबत सामाजिक संदेश या मॅरेथॉन स्पर्धेतून देण्यात आला. वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल १८ हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विजेते स्पर्धकांना तब्बल ४५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
आज सकाळी ६ वाजता विरार येथून पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनला सुरूवात झाली. त्यात मोहित राठोडने २ तास २४ मिनीटे २२ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. तर ६.३० वाजता वसई येथून सूरू झालेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटामधून अनिष थापा ( १ तास ०४ मिनीटे ३७ सेकंद ) तर महिला गटामधून किरण सहदेव (१ तास १७ मिनीटे ५१ सेकंद ) ने प्रथम क्रमांक पटकावलं.
दुसरीकडे ११ किलोमीटर, ५ किलोमीटर, बॅटल रन स्पर्धा, ज्येष्ठ पुरूष व महिला स्पर्धक, सामाजिक संदेश देणारी 'फन' अशा वेगवेगळ्या गटांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. एलिट धावपटू व्यतिरिक्त हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांक २ लाख ५० हजार रूपये, द्वितीय १ लाख २५ हजार रूपये तर तृतीय ७५ हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली. अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक १ लाख २५ हजार रूपये, द्वितीय ७५ हजार रूपये तर तृतीय ६० हजार रूपयांची पारितोषिके विजेत्यांनी पटकावली.
मॅरेथॉन फन रनमधून जनजागृती करण्यात आली. हैदराबाद पीडित महिलेला न्याय, झाडे वाचवा-पक्षी वाचवा, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक विषयांवर या स्पर्धेत प्रबोधन करण्यात आले. अनेक मराठी व हिंदी सिनेकलावंतांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
या मराठी कलाकारांनी लावली हजेरी -
सुदेश बेरी, मनोज जोशी, जयवंत वाडकर, राजपाल यादव, अभिजीत चव्हाण, अरूण कदम, भुपेंदर सिंग, कांचन पगारे, सुनील तावडे, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री असे अनेक कलाकार मंडळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी आले होते.