लंडन - आठवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जमैकाचा अनुभवी धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. चाचणीच्या निकालापूर्वी बोल्टने जमैका येथे त्याच्या ३४व्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडचा फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग आणि काही पाहुण्यांसोबत पार्टी केली होती.
डेली मेलच्या वृत्तानुसार, बोल्ट या व्हायरसच्या संपर्कात आला असून तो आता क्वारंटाइन राहील. ३४ वर्षीय बोल्टची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. रविवारी त्याला या आजाराची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
३४ वर्षीय बोल्ट ११ वेळा विश्वविजेता असून तो २०१७च्या लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर निवृत्त झाला. शेवटच्या स्पर्धेत बोल्टने रौप्यपदक जिंकले. ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टच्या नावावर अजूनही १०० व २०० मीटर शर्यतीचा विश्वविक्रम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१६मध्ये बोल्टने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव पुरुष धावपटू आहे.
बोल्टने २००२मध्ये विश्व ज्युनियर चॅम्पियनशीपच्या २०० मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यावेळी तो जागतिक स्तरावरील सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्याने २०१७मध्ये निवृत्ती जाहीर केली.