नई दिल्ली - डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नाव न सांगायच्या अटीवर नेमबाजपटूंच्या प्रशिक्षकाने याची माहिती दिली.
भारतीय संघासोबत असलेले प्रशिक्षक म्हणाले की, 'भारताचे दोन आघाडीचे नेमबाजपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे त्या दोघांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.'
हॉटेलमध्ये काही लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नाहीत. या शिवाय, हॉटेलमध्ये काही खासगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या नेमबाजपटूंना बायो-बबल उल्लंघनाचा धोका असल्याचे देखील प्रशिक्षकाने सांगितलं.
दरम्यान, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने या स्पर्धेत ५७ नेमबाजांची तुकडी मैदानात उतरवली होती. यात १५ ऑलिम्पिक कोटा मिळवलेल्या नेमबाजपटूंचा समावेश आहे.
गुरूवारी या स्पर्धेत युरोपचा आघाडीचा नेमबाजपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दरम्यान, स्पर्धेतील तिन्ही विभागांमध्ये म्हणजे रायफल, पिस्तूल आणि शॉटगनमध्ये ४०हून अधिक देशांचे तीनशेहून अधिक नेमबाजपटू सहभागी झाले आहेत.
हेही वाचा - मामेबहिण रितिकाची आत्महत्या, बबिता फोगाटने ट्विट करत व्यक्त केल्या भावना
हेही वाचा - ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार