टोकियो - भारताची मिश्र दुहेरी बॅडमिंटन जोडी प्रमोद भगत आणि पलक कोहली यांचा टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये कास्य पदकाच्या सामन्यात पराभव झाला. जपानच्या दाइसुके फुजीहारा आणि अकिको सुगिनो या जोडीने भारतीय जोडीचा पराभव केला.
एसएल3 एसयू 5 गटात, भारतीय जोडीचा कास्य पदकासाठी जपानच्या जोडीशी सामना झाला. या सामन्यात जपानच्या जोडीने 37 मिनिटात भारतीय जोडीचा 23-21, 21-19 अशा फरकाने पराभव केला. प्रमोद-पलक जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
प्रमोद भगत आणि पलक कोहली या जोडीचा उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या हॅरा सुसांतो आणि लिएनी ओकटिला जोडीने 21-3, 21-15 असा फरकाने पराभव केला होता. पण भारतीय जोडीला कास्य पदक जिंकण्याची संधी होती. तेव्हा जपानच्या जोडीने, पराभव करत भारतीय जोडीचे कास्य पदक जिंकण्याचे स्वप्न भंगवले.
दोन्ही जोडीमध्ये कडवी झुंज
पहिल्या गेममध्ये दोन्ही जोडीमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. भारतीय जोडीने 10-8 अशी आघाडी घेतली. तेव्हा जपानच्या जोडीने शानदार वापसी करत 10-10 अशी बरोबरी साधली. यानंतर सामना 14-14, 18-18, 20-20 अशा बरोबरीत होता. अशात भारतीय जोडी आणखी एक गुण घेत 21-20 अशी आघाडी घेतली. पण यानंतर जपानच्या जोडीने सलग तीन गुण घेत पहिला गेम 23-21 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये देखील भारतीय जोडीने तोडीस तोड खेळ केला. हा गेम एकवेळ 10-10 अशा बरोबरीत होता. पण यानंतर जपानच्या जोडीने दमदार खेळ करत हा गेम 21-19 अशा फरकाने जिंकत कास्य पदक आपल्या नावे केला.
हेही वाचा - टोकियो पॅराऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात भारतीय संघाची ध्वजवाहक असणार 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा
हेही वाचा - tokyo paralympics : कृष्णा नागरचा सुवर्णभेद; तर सुहास यथिराजने पटकावलं रौप्य