टोकियो - वंदना कटारिया हिने केलेल्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. या विजयासह भारतीय महिला संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान कायम आहे.
भारतीय महिला हॉकी संघासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना करो या मरो अशा स्थितीतील होता. उपांत्यपूर्व फेरीतीच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. यामुळे भारतीय संघाने जोरदार खेळ केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला वंदना कटारिया हिने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिला क्वार्टर संपण्यासाठी काही मिनिटे उरली असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारताची बचावफळी भेदली आणि बरोबरी साधली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये 17व्या मिनिटाला वंदना कटारिया हिने दुसरा गोल करता भारताला 2-1 आघाडी मिळवून दिली. मात्र पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना बरोबरी साधण्यात यश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 32व्या मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर कर्णधार राणी रामपाल हिने दिलेल्या पासवर नेहा गोयल हिने गोल केला आणि भारताला 3-2 अशी आघाडी मिळाली.
भारताला ही आघाडी खूप वेळ टिकवता आली नाही. 39व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेने अजून एक गोल करत पुन्हा बरोबरी साधली. तेव्हा 49व्या मिनिटाला वंदना कटारियाने सामन्यातील आपला तिसरा आणि निर्णायक ठरलेला गोल करून भारताला सामन्यात 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव करत दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण थोपवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
वंदना ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक साधणारी पहिली भारतीय महिला
वंदना कटारियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तीन गोल केले. तिने चौथ्या, सतराव्या आणि 49व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. या कामगिरीसह ती ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक गोल करणारी भारताची पहिली महिला हॉकीपटू ठरली.
हेही वाचा - Tokyo Olympics : भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!