मुंबई - भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 127 खेळाडूंचा मोठा संघ पाठवला आहे. परंतु भारताला आतापर्यंत फक्त तीन पदकं जिंकता आली आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही पदकं महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. यात मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी कांस्य पदकांची कमाई केली आहे.
मीराबाई चानू -
वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला दुसऱ्याच दिवशी पदक जिंकून दिलं. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. या गटात चीनची झीहुई हाउने एकूण 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनिशायाची विंडी केटिका आयशाह 194 किलो वजन उचलत कांस्य पदकाची विजेती ठरली.
पी. व्ही. सिंधू -
पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक जिंकून दिले. महिला एकेरीत सिंधूने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिला 21-13, 21-15 असे नमवलं. दरम्यान, पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगकडून पराभव पत्कारावा लागला होता. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले होते. सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.
लवलिना बोर्गोहेन -
भारतीय महिला बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेन हिचे 69 वजनी गटात सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य फेरीत लवलिनाचा तुर्कस्थानच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, हे भारताचे तिसरे पदक आहे.
हेही वाचा - स्वांतत्र्यदिनाचा लाल किल्ल्यावरील कार्यक्रम असणार खास, मोदींनी दिलं खास पाहुण्यांना आमंत्रण
हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू अंशू मलिक कांस्य पदकाच्या शर्यतीत
हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला तिसरं पदक; लवलिनाने जिंकलं कांस्य पदक