चेन्नई - भारतीय अव्वल पुरुष टेबल टेनिसपटू जी सथियानने कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यात १.२५ लाखांची देणगी दिली आहे. सथियानने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री मदत निधीला एक लाख रुपये आणि पंतप्रधान मदतनिधीला २५ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
मला वाटते की, ही आपली जबाबदारी आहे. संकटाच्या वेळी आपण समाजाला काहीतरी परत दिले पाहिजे. लोकांचे दु: ख पाहून मला खूप वाईट वाटले आणि मला असे वाटते की मीसुद्धा मदत केली पाहिजे, असे साथियानने दूरध्वनीवरून एका वृत्तसंस्थेला सांगितले.
सथियानने ट्विटरवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ही आपल्या सर्वांसाठी, खासकरुन रोजंदारीवरील मजुरांसाठी परीक्षेची वेळ आहे, असे साथियानने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने (आयटीटीएफ) कोरोना व्हायरसमुळे सर्व आयटीटीएफ स्पर्धा आणि संबंधित कार्यक्रम ३० जूनपर्यंत तहकूब केले आहेत.