नवी दिल्ली - स्टार फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टनला कोरोनाची लागण झाली आहे. हॅमिल्टन पूर्णपणे तंदुरुस्त असून तो कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत क्वारंटाइन आहे, असे हॅमिल्टनचा संघ मर्सिडीजने सांगितले. दोन दिवसांपूर्वी बहरीन ग्रँड प्रिक्स जिंकणारा हॅमिल्टन आता या आठवड्यातील सखीर ग्रँड प्रिक्समध्ये भाग घेणार नाही.
हेही वाचा - गावसरांनी पितृत्वाच्या रजेसंदर्भात सोडले मौन, म्हणाले...
ब्रिटनच्या ३५ वर्षीय हॅमिल्टनने यंदाच्या हंगामातील त्याचा ११वा विजय नोंदवला. या महिन्याच्या सुरूवातीस, त्याने विक्रमी सातवे विश्वविजेतेपद जिंकले. या विक्रमात, हॅमिल्टनने दिग्गज रेसर मायकेल शुमाकरच्या सर्वाधिक जागतिक जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. २०१३मध्ये त्याने मर्सिडीज संघात शुमाकरची जागा घेतली.
मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद -
दरम्यान, याआधी हॅमिल्टन याने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले होते. मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकल शूमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.