टोकियो - टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. समितीने शुक्रवारी ही माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह असलेली संबधित महिला कर्मचारी ३० जुलैपासून घरून काम करत होती आणि २९ जुलै रोजी तिने अखेर केंद्राला भेट दिली होती.
टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीने सांगितले, की ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांच्या टोकियो आयोजन समितीने टोकियोच्या 'चुओ वॉर्ड' कार्यालयात काम करणारी महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. संघटनेतील हे दुसरे कोरोना प्रकरण आहे.
समितीने पुढे सांगितले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित संस्थांशी काम करत राहील व आमच्या कर्मचार्यांना सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल. यापूर्वी, एक पुरुष कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असल्याचे एप्रिलमध्ये समितीने सांगितले होते.
यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा होईपर्यंत एकूण ५७ टक्के पात्रता पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.